पवारांनी इन्मॅच्युअर म्हणताच नितेश राणेंकडून ‘पार्थ’चे कौतुक


गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. या मागणीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आम्ही नातवाच्या बोलण्याला कवडीची किंमत देत नाही, ते इमॅच्युअर असल्याचे पवार यांनी म्हटल्यानंतर नारायण राणे यांचे पुत्र भाजप आमदार नितेश राणेंनी पार्थ पवार यांचे कौतुक केले आहे.

मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलताना, शरद पवार यांनी महाराष्ट्र पोलिसांवर आमचा पूर्ण विश्वास आहे. पण जर कोणी म्हणत असेल, अन्य चौकशीबाबत, तर त्याला विरोध असण्याचे कारण नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर, महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलीसांना मी 50 वर्षे ओळखतो. महाराष्ट्र पोलिसांवर माझा पूर्ण विश्वास आहे. चौकशी करायची असेल, सीबीआय किंवा कोणतीही एजन्सी वापरायची असेल, तर मी विरोध करणार नाही, असे शरद पवार यांनी सांगितले. त्याचबरोबर याबाबतची मागणी पार्थ यांनीच केल्याचे सांगताच, पार्थच्या मताला किंमत नसल्याचे पवार म्हणाले. तो इन्मॅच्युअर असल्याचेही त्यांनी म्हटले.

प्रसारमाध्यमांमध्ये शरद पवार यांचे हे विधान झळकताच, पार्थ पवारचे आमदार नितेश राणे यांनी कौतुक केले. आज परत सांगतो, पार्थ लंबी रेस का घोडा है… थांबू नकोस मित्रा!’ असे ट्विट नितेश यांनी केले आहे.

गेल्या काही दिवसांत पार्थ पवार यांनी महाविकास आघाडी सरकारसोबत आपली भूमिका नसल्याचे कृतीतून दाखवून दिले आहे. सुशांतसिंह राजपूतच्या मृत्युची सीबीआय चौकशी करण्याची मागणी पार्थ यांनी केली होती. तर, जय श्रीराम म्हणत राम मंदिराच्या भूमिपूजनाचे उघडपणे समर्थन केले होते.