… तर मग गोपीनाथ मुंडे आणि न्या. लोया यांच्यादेखील मृत्युची सीबीआय चौकशी करा


मुंबई – विरोधकांनी बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी लावून धरली होती. शिवसेना-भाजपा यांच्यात या प्रकरणावरुन संघर्ष वाढल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. या प्रकरणात आदित्य ठाकरेंची नाहक बदनामी केली जात असल्याचे शिवसेनेचे म्हणणे आहे. पण यावरुन शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी आता थेट भाजपला आव्हान दिले आहे.

सीबीआयकडे सुशांत सिंग प्रकरण देता, तर मग न्यायाधीश लोया आणि भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूचीही सीबीआय चौकशी करावी अशी मागणी खासदार अरविंद सावंत यांनी केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटणार आहे. कधीही सीबीआय चौकशी करता येते असे नाही, त्यासाठी याबाबत केंद्राकडे राज्य सरकारने शिफारस करावी लागते. सीबीआय चौकशीसाठी काही प्रक्रिया आहे. कुणीही लोकशाहीचे नियम डावलून चौकशी करु शकत नसल्यामुळे सुशांत प्रकरणात जशी सीबीआय चौकशी करत आहोत, तसे महत्व गोपीनाथ मुंडे आणि न्या. लोया प्रकरणात देऊन त्यांच्या प्रकरणाची देखील सीबीआय चौकशी करावी, आणि सत्य जनतेसमोर येऊ द्या, असे एबीपी माझाच्या चर्चेत अरविंद सावंत यांनी वक्तव्य केले आहे.

तसेच बिहार पोलिसांचा सुशांत सिंग राजपूत प्रकरणात काय संबंध आहे? या प्रकरणाची मुंबई पोलीस सखोल चौकशी करत आहेत. सीबीआयकडे तपास बिहार सरकारच्या सांगण्यावरुन सोपवावा हे गरजेचे नाही. मुंबई पोलिसांचे या प्रकारामुळे खच्चीकरण होत आहे. सुशांत प्रकरणाला काही लोक राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत. कुणीही उठावे आणि सीबीआय चौकशी लावावी, असे झाले तर याला काही अर्थ नाही. देशाच्या संविधानालाच धक्का देणार का? अशी टीका शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी भाजपवर केली आहे.