कोरोनासंदर्भातील आढावा बैठकीत योगींसमोरच टॅबवर गेम खेळत होते मुख्य सचिव


नवी दिल्ली – उत्तर प्रदेशमधील कोरोनासंदर्भातील कामकाजावर आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी एक फोटो ट्विट करत निशाणा साधाला आहे. सिंह यांनी आपल्या ट्विटमध्ये केलेल्या दाव्यानुसार कोरोनासंदर्भातील आढावा बैठकीमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे राज्यातील परिस्थितीसंदर्भात तपशील घेत असताना सरकारी अधिकारी आपल्या टॅबवर गेम खेळण्यात व्यस्त होते. हा फोटो ट्विट करताना त्यांनी त्याला, मी बरोबर म्हणालो होतो, कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी नाही तर क्रिकेटचा सामना खेळण्यासाठी योगींनी टीम ११ बनवली आहे. पाहा योगीजी कोरोनासंदर्भातील बैठक घेत असताना त्यांचे प्रमुख सचिव व्हिडिओ गेम खेळण्यात व्यक्त आहेत, अशी कॅप्शन दिली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि लॉकडाउनसंदर्भातील निर्णय घेण्यासाठी योगी आदित्यनाथ सरकारने ११ वेगवेगळ्या समिती तयार केल्या आहेत. ‘टीम एलेव्हन’ असे नाव त्या ११ समित्यांच्या गटाला देण्यात आले आहे. या टीम ११ च्या सदस्यांबरोबर मुख्यमंत्री योगी रोज बैठक घेऊन राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेत असतात. संजय सिंह यांनी पोस्ट केलेला फोटो हा टीम ११ च्या बैठकीदरम्यानचा असल्याचे सांगण्यात येत आहे. योगी आदित्यनाथही सरकारी अधिकाऱ्यांबरोबर या बैठकीला उपस्थित असल्याचे दिसत आहे. हा फोटो व्हायरल झाला असून तीन हजारहून अधिक जणांनी हा रिट्विट केला आहे.