रशियाने कोरोना लसीला दिली अधिकृत मंजूरी, पुतिन यांच्या मुलीला टोचली पहिली लस

मागील अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या रशियाच्या कोरोना प्रतिबंधक लसीला अखेर आज मंजूरी देण्यात आली आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन यांनी याबाबत घोषणा केली आहे. त्यांनी माहिती दिली की, कोरोना प्रतिबंधक लसीला आरोग्य मंत्रालयाने मंजूरी दिली आहे. माझ्या मुलीला आधीच ही लस टोचण्यात आली आहे. मात्र त्यांनी हे स्पष्ट केली नाही त्यांनी स्वतःला लस टोचून घेतली की नाही.

पुतिन यांनी माहिती दिली की, माझ्या मुलीने देखील लस टोचून घेतली आहे. सुरुवातीला थोडासा ताप होता, मात्र आता सर्वकाही ठीक आहे. त्यांनी सांगितले की, आता माझी मुलगी ठीक असून, तिला बरे वाटत आहे. तिने देखील या संपुर्ण परिक्षणामध्ये भाग घेतला होता.

पुतिन यांच्या अधिकृत घोषणेनंतर आता रशिया कोरोना प्रतिबंधक लस बनवणारा जगातील पहिली देश ठरला आहे. रशियाने ही लस आधी आरोग्य कर्मचाऱ्यांना आणि त्यानंतर वृद्धांना देण्याची योजना बनवली आहे.

रशियाने इतर देशांना देखील या लसीचा पुरवठा करणार असल्याचे म्हटले आहे. सप्टेंबरपासून लसीचे उत्पादन सुरू होईल. ही लस मॉस्कोच्या गामलेया इंस्टिट्यूटने तयार केली आहे. मात्र लसीचे ह्यूमन ट्रायल अवघ्या 2 महिन्यात पुर्ण केल्याने जागतिक आरोग्य संघटनेने देखील या लसीबाबच शंका उपस्थित केली आहे. रशियाच्या आरोग्य मंत्र्यांने आधीच ऑक्टोबरपासून लसीकरण सुरू करणार असल्याचे म्हटले आहे. लस निर्माण करणाऱ्या वैज्ञानिकांनी स्वतः ही लस टोचली आहे.