मास्क न लावता फिरणाऱ्या रविंद्र जडेजाच्या पत्नीची पोलिसांसोबत बाचाबाची

कोरोना व्हायरसमुळे बाहेर फिरताना मास्क घालणे अनिवार्य आहे. मात्र असे असतानाही काहीजण विना मास्कचे बाहेर फिरताना आढळतात. भारतीय क्रिकेटपटू रविंद्र जडेजा व त्याची पत्नीने गाडीतून फिरत होते, मात्र जडेजाच्या पत्नीने मास्क न लावल्यामुळे महिला कॉन्स्टेबलसोबत बाचाबाची झाल्याची घटना समोर आली आहे.

जडेजाच्या पत्नीने मास्क न लावल्यामुळे महिला पोलीस कर्मचाऱ्याने त्यांना अडवले व दंड भरण्यास सांगितला. रात्री 9 वाजताच्या सुमारास जडेजा व त्याची पत्नी रिवाबा राजकोटच्या रस्त्यावरून कारमधून जात होते. यावेळी महिला कॉन्स्टेबल सोनल गोसाई यांनी दोघांना अडवले व मास्क न लावल्याने दंड भरण्यास सांगितला. दंड भरण्यास सांगितल्याने जडेजाने महिला कॉन्स्टेबलशी हुज्जत घातली.

एनडीटिव्हीच्या रिपोर्टनुसार, जडेजाने कारमध्ये मास्क घातला होता, मात्र त्याच्या पत्नीने मास्क लावलेला नव्हता. कारमध्ये 2-3 इतर लोक देखील होती. जडेजाची पत्नी रिवाबा भाजप नेत्या आहेत.

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, जडेजा आणि पोलीस कर्मचाऱ्यामध्ये बाचाबाची झाली. यानंतर गोसाई यांनी अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना जवळील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले व नंतर काही वेळाने बरे वाटल्यानंतर सोडण्यात आले. दरम्यान, अद्याप कोणीही या प्रकरणात तक्रार दाखल केलेली नाही.