आता अवघ्या 45 मिनिटांत Swiggy चे Instamart करणार किराणा मालाची घरपोच डिलिव्हरी


कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता देशातील नागरिकांना सरकारकडून फक्त अत्यावश्यक कामासाठीच घराबाहेर पडण्याचा सल्ला देण्यात येत आहे. अशा संकट काळात ऑनलाईन शॉपिंग अ‍ॅप्समुळे लोकांची होणारी गैरसोय दूर होण्यात मदत होत आहे. लोक घरी बसून त्यांना लागत असलेल्या गरजेच्या गोष्टींची ऑर्डर करू शकतात. या प्रकारे विविध वस्तूंपासून, अन्नधान्य, भाजीपाला अशा अनेक गोष्टी आपल्या घरपोच पोहोचत आहेत. आता या प्रक्रियेमध्ये अजून एक नाव जोडले गेले आहे. ऑनलाईन फूड डिलिव्हरी स्विगीने आता अवघ्या 45 मिनिटांत किराणा मालाची घरपोच डिलिव्हरी सुरू केली आहे. आपल्या किराणा होम डिलीव्हरी सेवेचे कंपनीने स्विगी इन्स्टामार्ट (Swiggy Instamart) असे नाव ठेवले आहे.

ऑनलाईन शॉपिंग आणि होम डिलिव्हरीचा वाढता बाजार पाहता स्विगीने देखील या क्षेत्रात प्रवेश केला आहे. स्विगीची या सेगमेंटमध्ये Flipkart Quick, Big Basket, Dunzo, Grofers यांच्याशी स्पर्धा असेल. स्विगीच्या मते, ऑर्डर मिळाल्यानंतर 30-45 मिनिटांच्या आत किराणा माल घरपोच केला जाईल. सकाळी 7 ते दुपारी 12 या वेळेत ही सुविधा उपलब्ध असेल. स्नॅक्स, आईस्क्रीम, इन्स्टंट जेवण, फळ-भाज्या, किराणा वस्तू स्विगी इंस्टामार्ट सेवेद्वारे मागवता येऊ शकतील.

कंपनीची डार्क स्टोअर्सद्वारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत माल पोहोचण्याची योजना आहे. त्यात 2,500 हून अधिक वस्तूंचा समावेश असेल. या विभागात स्विगी मोठ्या प्रमाणावर जाण्याची तयारी करत आहे. व्हर्चुअल स्टोअरच्या भागीदारीत स्विगीने ही सेवा सुरू केली आहे. सध्या गुरुग्राममध्ये ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत ही सुविधा बंगळुरुमध्येही उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे स्विगीने सांगितले. कोरोनामुळे स्विगीच्या फूड डिलिव्हरी व्यवसायावर झालेला परिणाम आता किराणा डिलिव्हरीसह दूर करण्याचा प्रयत्न कंपनीकडून केला जात आहे.