कोरोना प्रतिबंधक लसीच्या वितरणासंदर्भात टास्क फोर्सची उद्या महत्त्वपूर्ण बैठक


नवी दिल्ली – केंद्र सरकारने लस खरेदी, प्राधान्यक्रम आणि वितरण या संबंधी निर्णय घेण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन केली असून उद्या बुधवारी निती आयोगाचे डॉ. व्ही.के.पॉल यांच्या अध्यक्षतेखाली या तज्ज्ञ समितीची महत्त्वाची बैठक होणार आहे. लस हाच कोरोना व्हायरसच्या संकटातून मुक्ती मिळवण्याचा सध्याच्या घडीला एकमेव मार्ग आहे. जगातील तीन ते चार लसी मानवी चाचणीच्या अंतिम टप्प्यावर पोहोचल्या असून सर्व काही सुरळीत झाले तर सप्टेंबरपासून लस सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होऊ शकते.

त्या पार्श्वभूमीवर बुधवारी टास्क फोर्सची आपल्याकडे लसीकरण कसे करायचे? त्याचा आराखडा निश्चित करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. देशातील २२ लाखापेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आहे, तर आतापर्यंत ४४ हजार जणांना आपला जीव गमावावा लागला आहे. राज्य सरकार आणि लस उत्पादकांबरोबरही ही समिती चर्चा करेल असे आरोग्य मंत्रालयाने सांगितल्याचे वृत्त हिंदुस्थान टाइम्सने दिले आहे.

सरकारने तज्ज्ञांची ही समिती कोरोनावरील लसीचा कार्यक्रम ठरवताना सर्व अंगांनी विचार करण्यासाठी स्थापना केली. संबंधित मंत्रालये, संस्थांचे प्रतिनिधी यांचा यामध्ये समावेश आहे. या टास्क फोर्सवर लस निवडण्यापासून ते खरेदी आणि वितरणाची जबाबदारी असेल.