जाणून घ्या जगातील पहिली कोरोना लस कोणाला, कधी, कुठे आणि किती दरात मिळणार?


कोरोनाच्या लढाईत रशियाने महत्वपूर्ण यश मिळवले असून संपूर्ण जगाला मागे टाकत रशियाने जगातील पहिली कोरोना प्रतिबंधक लस मंगळवारी मंजूर केली आहे. यासंदर्भातील महत्वपूर्ण घोषणा रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी केली आहे. रशियामध्ये तयार झालेल्या कोरोना प्रतिबंधक लसीला आरोग्य मंत्रालयाकडून मंजूरी देण्यात आली आहे. तिचा पहिला डोस माझ्या मुलींना देण्यात आली असून त्या दोघींची तब्येत पूर्णपणे बरी असून त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम झाले नसल्याची माहिती पुतीन यांनी दिली. त्याचबरोबर ही लस बनवण्यात ज्यांनी ज्यांनी योगदान दिले आहे, त्यांचे पुतीन यांनी आभार देखील मानले आहेत. या कोरोना प्रतिबंधक लसीने सर्व महत्वपूर्ण चाचण्यांचे टप्पे पार केले असून ती आता मोठ्या प्रमाणात तयार केली जाईल.

दरम्यान या लसीचा पहिला डोस फ्रंटलाईनमध्ये काम करणाऱ्यांना म्हणजे आरोग्य कर्मचार्‍यांना दिला जाईल, त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना याचा डोस देण्यात येईल, असे रशियन आरोग्यमंत्री मिखाईल मुराश्को यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर सध्या या लसीची मर्यादित डोस तयार करण्यात आले असून तिला नियामक मान्यता प्राप्त झाली आहे, म्हणून या लसीचे आता औद्योगिक उत्पादन सप्टेंबरपासून सुरू होऊ शकेल आणि देशभरात ऑक्टोबरपासून तिचे लसीकरण सुरू करता येऊ शकेल, असे रशियाने म्हटले आहे.

जगभरात ही लस पुरविण्याचे आश्वासन रशियाकडून याआधीच देण्यात आले आहे. पण जगभरातील बहुतांश देश अद्यापही या लसीबद्दल संकोच व्यक्त करत आहेत. या लसीबाबत पाश्चात्य देशांसह जागतिक आरोग्य संघटनेनेही चिंता व्यक्त केली आहे. पुरेशा डेटाअभावी लस पुरवठा करणे योग्य ठरणार नाही. आपल्या नागरिकांना रशियन लस डोस देणार नसल्याचे ब्रिटनने स्पष्टपणे सांगितले आहे. अशा परिस्थितीत, लस सुरुवातीच्या काळात इतर देशांमध्ये पाठविली जाऊ शकत नाही. या लसीचा रशियाच्या सर्वसामान्य जनतेवर काय परिणाम होतो आहे, त्यावरुनच इतर देश निर्णय घेऊ शकतात.

टीएएसएस या रशियन एजन्सीच्या म्हणण्यानुसार रशियामध्ये ‘मोफत’ ही लस उपलब्ध होईल आणि देशाच्या अर्थसंकल्पातून यावरील खर्च दिला जाईल. उर्वरित देशांसाठी देण्यात येणाऱ्या लसीची किंमत अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. एडेनोव्हायरस बेस करून ही लस मॉस्कोच्या गामलेया संशोधन संस्थेने विकसित केली आहे. या लसीबाबत संशोधकांचा असा दावा आहे की, या लसीमध्ये वापरलेले कण स्वत:ला रेप्लिकेट करु शकत नाहीत. त्याचबरोबर या लसीचा डोस संशोधन आणि उत्पादनात गुंतलेल्या बर्‍याच लोकांनी स्वत: ला दिला आहे. काही लोकांना डोस दिल्यानंतर ताप आला, परंतु त्या लोकांना पॅरासिटामोल औषधाचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

रशियाने जगातील पहिली कोरोना प्रतिबंधक लस लॉन्च केली असली तरी जगभरातील अन्य देश सध्या कोरोना लसींची चाचणी करीत आहे. अमेरिका, ब्रिटन, इस्त्राईल, जपान, चीन भारत यासह अनेक देशांमध्ये लसीची क्लिनिकल चाचण्या सुरू आहेत. त्यातील एकूण ५ लसी चाचणीच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचल्या असून त्यांचा प्राथमिक निकाल ऑक्टोबरपर्यंत अपेक्षित आहे.