रेल्वे सेवेसंदर्भात सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मेसेजवर रेल्वे मंत्रालयाचे स्पष्टीकरण


मुंबई : काल व्हॉट्सअॅपवर 30 सप्टेंबरपर्यंत एकही लोकल आणि एक्सप्रेस गाड्या धावणार नसल्यासंदर्भातील एक मेसेज प्रचंड व्हायरल झाला होता. मुंबईसह देशभरातील प्रवाशांच्या या मेसेजमुळे प्रतिक्रिया येऊ लागल्यानंतर ही बातमी खोटी असल्याचे रेल्वे मंत्रालयाने ट्विट करुन स्पष्ट केले. अद्यापही या संदर्भात कोणताही निर्णय झाला नसल्याचे रेल्वे मंत्रालयाने सांगितले आहे.

सोमवारी (10 ऑगस्ट) व्हॉट्सअॅपवर पूर्व रेल्वेचे एक पत्र व्हायरल झाल्यामुळे, येत्या 30 सप्टेंबरपर्यंत भारतीय रेल्वे बंद राहणार असल्याच्या बातम्या येऊ लागल्या होत्या. काही वृत्तपत्रांनी देखील त्यांच्या वेबसाईटवर त्या पत्राच्या आधारे 30 सप्टेंबरपर्यंत लोकल आणि एक्स्प्रेस गाड्या धावणार नाहीत, अशा आशयाच्या बातम्या प्रकाशित केल्या. त्यामुळे मोठा संभ्रम निर्माण झाला.

मुंबई आणि आसपासच्या परिसरात राहणारे प्रवासी संतप्त झाले. कारण लोकल आणखी 50 दिवस धावणार नसल्याने, रस्ते मार्गाचा वापर करुन ऑफिसला जाणे त्यांना परवडणारे नाही. व्हॉट्सअॅप आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या बातम्या प्रचंड व्हायरल झाल्यामुळे रेल्वेच्या अधिकाऱ्यांची प्रचंड डोकेदुखी झाली.

अखेर यामध्ये सोमवारी संध्याकाळी रेल्वे मंत्रालयाने हस्तक्षेप केला. एक ट्विट रेल्वे मंत्रालयाच्या ट्विटर हॅण्डलवरुन करण्यात आले. यात, या सर्व बातम्या खोट्या असल्याचे सांगण्यात आले. काही वर्तमानपत्रांनी चुकीच्या बातम्या देऊन रेल्वे सेवा 30 सप्टेंबरपर्यंत धावणार नाहीत असे सांगितले आहे, पण ते चुकीचे असून असे कोणतेही परिपत्रक आम्ही जारी केलेले नाही, असे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले. त्याचबरोबर पुढील सूचना मिळेपर्यंत सध्या सुरु असलेल्या स्पेशल एक्स्प्रेस गाड्या सुरु राहतील, असे सांगितल्या या चर्चेला पूर्णविराम मिळाला.