भाजपचे फायरब्रँड नेते किरीट सोमय्या यांच्यासह पत्नीलाही कोरोनाची लागण


मुंबई – राज्यावरील कोरोनाचे संकट दिवसेंदिवस अधिक वेगाने ओढावत आहे. दरम्यान, या कोरोनाने सर्वसामान्यांसह अनेक राजकीय नेते, बॉलिवूड कलाकार आणि खेळाडूंना आपल्या विळख्यात घेतले आहे. त्यातच आता माजी खासदार आणि भाजपचे फायरब्रँड नेते किरीट सोमय्या यांच्यासह त्यांच्या पत्नीलाही कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी स्वत: ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. मी आणि माझी पत्नी डॉ मेधा सोमय्या यांना कोरोनाची बाधा झाली आहे. सध्या रुग्णालयात आमच्यावर उपचार सुरु असल्याचे किरीट सोमय्या यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. किरीट सोमय्या यांना कोरोना झाल्याचे समजताच त्यांच्या समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत होत असलेल्या वाढीमुळे आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान, कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक कठोर पावले उचलली जात आहेत. राज्यात आज आणखी 9 हजार 181 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 293 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 5 लाख 24 हजार 513 वर पोहचली आहे. यापैंकी 18 हजार 50 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.