भाजप खासदाराने बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांना ठरवले देशद्रोही


नवी दिल्ली : पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे भाजप खासदार अनंत कुमार हेगडे चर्चेत आले आहेत. त्यांनी यावेळी चक्क बीएसएनएल कर्मचाऱ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. केंद्र सरकार बीएसएनएलचे खाजगीकरण करणार असल्यामुळे ८८००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले जाणार असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर बीएसएनएलचे कर्मचारी देशद्रोही असून प्रसिद्ध कंपनी विकसित करण्यासाठी जे काम करण्यास इच्छुक नाहीत, असे अनंतकुमार हेगडे यांनी म्हटले आहे. अनंत कुमार हेगडे १० ऑगस्ट रोजी उत्तर कन्नड जिल्ह्यातील कुमटा येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना या आशयाचे वक्तव्य केले आहे. या संदर्भातील वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

दरम्यान, वादग्रस्त वक्तव्य करण्याची खासदार अनंतकुमार हेगडे यांची ही पहिलीच वेळ नाही. त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल गेल्या काही दिवसांपूर्वी असे वक्तव्य केले होते, ज्यावरुन बराच वाद झाला होता. ज्या सत्याग्रहाचे नेतृत्त्व महात्मा गांधीजींनी केले, ते वास्तवात आंदोलन नव्हे, तर एक नौटंकी असल्याचे वक्तव्य अनंतकुमार हेगडे यांनी केले होते. त्याचबरोबर अनंतकुमार हेगडे म्हणाले होते की, इंग्रजांच्या सहमतीने या आंदोलनाचे नेतृत्त्व करण्यात आले. या कथित नेत्यांपैकी एकालाही पोलिसांनी मारले नाही. बलिदान आणि सत्याग्रहामुळे भारताला स्वातंत्र्य मिळाले हे काँग्रेसचे समर्थक सांगतात. पण हे सत्य नाही. सत्याग्रहामुळे इंग्रजांनी देश सोडला नव्हता.