मी पक्षाकडे कोणतेही पद मागितले नाही, द्वेषाचे राजकारण नको; सत्तासंघर्षाला पायलट यांचा पुर्णविराम

मागील महिनाभरापासून राजस्थानमध्ये सुरु असलेल्या सत्तासंघर्षाला अखेर पुर्णविराम मिळाल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात सचिन पायलट यांनी बंड पुकारले होते. मात्र काल काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची भेट घेतल्यानंतर त्यांची नाराजी दूर झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. आज ते जयपूरमध्ये परतल्यानंतर त्यांचे स्वागत करण्यात आले.

सचिन पायलट म्हणाले की, त्यांनी पक्षाकडे कोणत्याही प्रकारची मागणी केली नव्हती व कोणतेही द्वेषाचे राजकारण करू नाही. पायलट यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर त्यांची नाराजी दूर झाली असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे सचिन पायलट यांचे बंड शमल्याने येत्या 14 ऑगस्टपासून राजस्थानमध्ये सुरू होणाऱ्या विधानसभा सत्रापुर्वी काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे.

पायलट म्हणाले की, मी पक्षाच्या विरोधात कोणतेही वक्तव्य केले नव्हते आणि काँग्रेस हाय कमांडशी काही समस्यांबाबत चर्चांसाठी दिल्लीला गेलो होतो. मी पक्षाकडे कोणतेही पद देखील मागितलेले नाही. तसेच आपल्याविरोधात करण्यात आलेल्या वक्तव्यांमुळे दुःख झाले, असेही ते म्हणाले.

ते म्हणाले की, माझ्याबाबत जे शब्द वापरले गेले त्याने मला आश्चर्यचा धक्का बसला व दुःख वाटले. द्वेषाचे राजकारण कधीच नसावे. दरम्यान, ते जयपूरला परतल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी केली होती.