अदार पूनावाला यांचा या वर्षाच्या अखेरीस देशाला कोरोना लस मिळण्याचा दावा


पुणे – सध्या संपूर्ण जग कोरोना या दुष्ट संकटासोबत लढा देत आहेत. अशा संकटकाळात प्रत्येक देश या रोगावर नियंत्रण मिळविणारी लस शोधण्याच्या प्रयत्नात आहेत. तर दुसरीकडे आपल्या देशातील शास्त्रज्ञ देखील अहोरात्र मेहनत करुन एक करून लस विकसित करत आहे. दरम्यान, देशातील कोरोना प्रतिबंधक लसीची चाचणी सुरू असतानाच यादरम्यान एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. सिरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पूनावाला यांनी या वर्षाच्या अखेरीस भारताला आपली स्वतःची कोरोना प्रतिबंधक लस मिळणार असल्याचा दावा केला आहे.

आपली कंपनी डिसेंबर महिन्याच्या सुरूवातीला कोरोना प्रतिबंधक लस लाँच करणार असल्याचे अदार पूनावाला म्हणाले. त्यांनी हा दावा सीएनबीसी टीव्ही १८ ला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. कोरोना प्रतिबंधक लसीची चाचणी पुढील दोन आठवड्यांमध्ये सुरू करण्यात येणार आहे. आयसीएमआरला सोबत घेऊनच ही चाचणी करण्यात येईल. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस आम्ही लसीचे उत्पादन सुरू करणार असल्याचे पूनावाला म्हणाले.