इस्रायलमध्ये तयार होत आहे व्हाईट गोल्ड आणि हिऱ्यांचा ११ कोटींचा मौल्यवान मास्क


मागील सहा महिन्यांपासून आपण सर्वचजण एकजुटीने कोरोना या दुष्ट संकटासोबत लढाई लढत आहोत. आता त्या लढाईला काहीशा प्रमाणात यश मिळत असल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे. त्यातच या रोगाचा समूळ नाश करण्यासाठी जगभरातील अनेक शास्त्रज्ञ संशोधक अहोरात्र मेहनत घेऊन प्रतिबंधक लस शोधण्यात व्यस्त आहेत. पण अशा संकट काळात आपण देखील आपले कर्तव्य चोखपणे बजावत आहोत. जसे की, वारंवार हात धूणे, मास्क वापरणे, स्वच्छता राखणे. पण सर्वात मोलाची भूमिका आपल्या तोंडावरील मास्क बजावत आहे. त्यामुळे या संसर्गजन्य आजारापासून खबरदारीसाठी वापरण्यात येणाऱ्या फेस मास्कला अद्यापही बाजारात मागणी कायम आहे.

त्यामुळेच या मास्कचे महत्व जाणून जगभरातील विविध कंपन्या आणि ज्वेलर्स आपल्या विशिष्ट ग्राहकांसाठी मौल्यवान मास्क तयार करीत आहेत. असाच एक महागडा मास्क इस्रायलची एका कंपनी देखील बनवत आहे. या मास्कची किंमत ऐकून तुम्ही आवाक् व्हाल! हो, कारण हा मास्क तब्बल ११ कोटींचा आहे. हा मास्क व्हाइट गोल्ड आणि हिऱ्यांचा वापर करुन बनवण्याचे काम सुरु असल्यामुळे सध्या माध्यमांमध्ये या मास्कची खूपच चर्चा सुरु आहे.

आजवर विविध प्रकारचे सोन्या-चांदीचे मास्क भारतात बाजारात आले आहेत. त्यांच्या किंमती काही हजारो रुपयांपासून लाखो रुपयांपर्यंत आहेत. भारतातील सर्वात महागडा २.७५ लाख रुपयांचा सोन्याचा मास्क कोईम्बतूर येथील एका सराफी व्यापाऱ्याने बनवला होता. यामध्ये सोने आणि चांदीचे धागे बसवण्यात आले होते. पण आता दागिने बनवणाऱ्या Yvel company नामक इस्रायली कंपनी बनवत असलेला मास्क हा तब्बल ११ कोटी रुपयांचा आहे.

या मास्कबाबत कंपनीने असा दावा केला आहे की, ते बनवत असलेला कोरोना व्हायरस मास्क हा जगातील सर्वाधिक महागडा मास्क आहे. सोन्याबरोबरच हिऱ्यांचा देखील वापर या मास्कमध्ये करण्यात आला असून त्याची किंमत दीड मिलियन डॉलर अर्थात भारतीय रुपयांमध्ये ११ कोटी रुपये आहे.

१८ कॅरटच्या व्हाइट गोल्डचा वापर जगातील या सर्वाधिक महागड्या मास्कसाठी करण्यात येणार असून त्यावर ३,६०० पांढऱ्या आणि काळ्या रंगाच्या हिऱ्यांची सजावट करण्यात येणार आहे. त्यावर ग्राहकाच्या मागणीनुसार N99 फिल्टर बसवण्यात येणार आहे. सध्या हे मास्क बनवण्याचे काम सुरु असून ग्राहकाला या वर्षाच्या शेवटीपर्यंत तो हवा आहे. या मास्कचे डिझायनर इसाक लेवी यांनी ही माहिती दिली.