दिशाहीन झालेल्या काँग्रेस पक्षाला हवा पूर्णवेळ अध्यक्ष; शशी थरुर यांची मागणी


नवी दिल्ली – आज सोनिया गांधींना काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष म्हणून एक वर्ष पूर्ण झाले आहे. काँग्रेसला एक वर्षात पूर्णवेळ अध्यक्ष निवडण्यात यश आलेले नाही. याच दरम्यान पक्षाचे ज्येष्ठ नेते नेते शशी थरूर यांनी पक्षाला पूर्णवेळ अध्यक्षांची गरज आहे, असे म्हटले आहे.

थरूर म्हणाले, आता लोकांमध्ये काँग्रेस हा दिशाहीन पक्ष असल्याची धारणा दिसून येत आहे. ती बदलण्यासाठी पूर्णवेळ अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया गतिमान केली पाहिजे. अनिश्चित काळासाठी त्यांच्याकडून अंतरिम अध्यक्षपद जबाबदारीची अपेक्षा करणे योग्य होणार नाही. पक्षाची धुरा राहुल गांधी सांभाळू शकतात. त्यांच्यात तसे नेतृत्व आहे. त्यांनी केवळ आपला राजीनामा परत घ्यावा. कारण डिसेंबर २०२२ पर्यंत पक्षाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली होती. पण, राहुल अध्यक्ष होऊ इच्छित नसल्यास पक्षाने निवडीची कवायत नव्याने सुरू करायला हवी. जनतेमध्ये निर्माण झालेली प्रतिमा आपण पुसून टाकली पाहिजे. काँग्रेस भरकटली आहे. राष्ट्रीय पातळीवर काँग्रेस विरोधी पक्षाची भूमिका नेमकेपणाने निभावू शकत नाही, असे लोकांना वाटते याकडे थरूर यांनी लक्ष वेधले.

३ जुलै २०१९ रोजी पक्षातील सुधारणांसाठी राहुल यांनी काही सल्ले दिले होते. पक्षात त्यावर अद्यापही अंमलबजावणी किंवा काही निर्णय झालेला नाही. राहुल यांना या गोष्टींचे वाईट वाटते. कोण कोण पक्षाच्या पराभवासाठी जबाबदार आहे याचे जाबदायित्व निश्चित करावे लागेल, असे त्यांनी म्हटले होते. याची जबाबदारी त्यांनी स्वत: घेतली होती. परंतु यूपीए-२ च्या काही मंत्र्यांनी जबाबदारी घेतली नव्हती. त्याशिवाय नवीन अध्यक्ष निवडीसाठी राहुल यांनी एका समितीची स्थापना केली होती. या दिशेनेदेखील काही काम झालेले नाही.