सुशांतचे कुटुंबिय संजय राऊत यांच्यावर ठोकणार मानहानीचा दावा


मुंबई – शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी देखील अभिनेता सुशांत सिंह राजपुत मृत्यू प्रकरणात आता उडी घेतली असून मुंबई पोलिसांची स्तुती करत त्यांनी सुशांतचे वडिल के.के. सिंह यांच्या दुसऱ्या लग्नावर प्रश्न उपस्थित केले होते. सुशांत आपल्या वडिलांवर या लग्नामुळे नाराज होता, असा दावा त्यांनी केल्यामुळे सुशांतचे कुटुंबिय चांगलेच संतापले आहेत. संजय राऊत यांच्याविरोधात मानहानीचा दावा ठोकण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

या संदर्भातील वृत्त आजतक या वृत्तवाहिनीने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार संजय राऊत यांच्या विरोधात मानहानिचा दावा ठोकण्याचा इशारा सुशांतचे चुलत भाऊ भाजप नेता नीरज सिंह बब्लू यांनी दिला आहे. सुशांतच्या वडिलांनी दोन लग्न केली नाहीत. असे खोटे आरोप करणे चुकीचे आहे. संजय राऊत अफवा पसरवून या प्रकरणाची दिशा बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. कुटुंबावर केलेल्या या आरोपासाठी आम्ही त्यांच्यावर मानहानीचा दावा ठोकणार असल्याचा इशारा नीरज सिंह यांनी आज तकला दिलेल्या मुलाखतीत दिला.

सुशांत सिंह प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यावरून संजय राऊत यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून ‘रोखठोक’ सदरातून अनेक प्रश्न उपस्थित केले होते. मुंबई पोलीस ही जगातील सर्वोच्च तपास यंत्रणा आहे. मुंबई पोलीस दबावाला बळी पडत नाहीत. ते पूर्णपणे प्रोफेशनल आहेत. पोलिसांनी शीना बोरा हत्या प्रकरणाचा छडा लावला. त्यात अनेक बडी नावे गुंतली होती, पण पोलिसांनी सगळय़ांना तुरुंगात पाठवले.

२६/११ चा दहशतवादी हल्ला परतवून लावला व भक्कम पुरावे उभे करून कसाबला मुंबई पोलिसांनीच फासावर लटकवले. त्यामुळे सुशांतसारख्या प्रकरणात केंद्राने हस्तक्षेप करणे हा मुंबई पोलिसांचा अपमान आहे. ‘सीबीआय’ ही केंद्रीय तपास यंत्रणा असली तरी ती स्वतंत्र आणि निःपक्ष नाही हे अनेकदा दिसून आले. अनेक राज्यांनी सीबीआयवर बंदीच घातली आहे, असे राऊत यांनी म्हटले.