शाह फैझल यांनी सोडले राजकारण, पुन्हा प्रशासकीय सेवेत दाखल होण्याची शक्यता

प्रशासकीय सेवेतून बाहेर पडून राजकारणात येणाऱ्या शाह फैझल यांनी आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. शाह फैझल यांनी राजकारण सोडण्याचा निर्णय घेतला असून, या अंतर्गत त्यांनी जम्मू अँड काश्मिर पिपल्स मूव्हमेंटचे अध्यक्षपद सोडले आहे. मागील वर्षी कलम 370 हटवल्यानंतर इतर नेत्यांप्रमाणे शाह फैझल यांना देखील ताब्यात घेण्यात आले होते. काही दिवसांपुर्वीच त्यांना सोडण्यात आले असून, आता त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

जम्मू अँड काश्मिर पिपल्स मूव्हमेंटचे वरिष्ठ नेते फिरोज पीरजादा यांनी सांगितले की, शाह फैझल यांनी स्वतःला पक्षापासून वेगळे केले असून, पक्षाच्या नेत्यांनी आता माझ्याकडे नेतृत्व सोपवले आहे.

फैझल यांनी राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता ते पुन्हा प्रशासकीय सेवेत जाणार अशी चर्चा सुरू झाली आहे. यामागील कारणही तसेच आहे. कारण त्यांनी आयएएस सेवेचा दिलेला राजीनामा अद्याप स्विकारण्यात आलेला नाही. शाह यांनी स्वतः राजीनामा देत राजकीय पक्षाची स्थापना केली होती. असे असले तरी जम्मू-काश्मिरच्या आयएएस अधिकाऱ्यांच्या यादीतून त्यांचे नाव हटविण्यात आले नव्हते.

फैझल यांच्या नोकरीविषयी पीरजादा म्हणाले की, ते पुढे काय करतील, याच्याबाबत आम्हाला माहिती नाही. ते अमेरिकेत जाऊन शिक्षण करण्याचा विचार करत आहेत, सोबतच ते पुन्हा प्रशासकीय सेवेत येऊ शकतात, असेही रिपोर्ट आहेत. ते काय करतील याची आम्हाला माहिती नाही. दरम्यान, फैझल हे 2010 सालच्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. 2019 मध्ये त्यांनी प्रशासकीय सेवेचा राजीनामा देत, स्वतःचा पक्ष स्थापन केला होता.