पाकिस्तानला दणका देत सौदी अरेबियाने तोडला कच्च्या तेलाचा पुरवठा


रियाध – सौदी अरेबियाने मे महिन्यापासून पाकिस्तानला कच्चे तेल देण्यास नकार दिला आहे. कारण सौदीची 3.2 अब्ज डॉलरची रक्कम पाकिस्तानने थकविली आहे. सौदीकडून 2018 मध्ये 6.2 अब्ज डॉलरचे पाकिस्तानने कर्ज घेतले होते. या पॅकेजनुसार पाकिस्तानला 3.2 अब्ज डॉलरचे कच्चे तेल सौदीकडून उधारीवर घेण्याची सूट होती. दोन महिने आधीच याची मुदत संपली आहे.

यासंदर्भातील वृत्त एक्स्प्रेस ट्रिब्यूनने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार याबाबत सौदी अरेबिया आणि पाकिस्तानमध्ये 6.2 अब्ज डॉलरचे कर्ज घेण्याबाबत नोव्हेंबर 2018 मध्ये करार झाला होता. पाकिस्तान पेट्रोलियम विभागाचे प्रवक्ते साजिद काझी यांनी सांगितले की, आता या कराराची मुदत संपली आहे. या कराराच्या नुतनीकरणासाठी अर्थ विभाग प्रयत्न करत आहे. याबाबत सौदी अरेबियाशीही चर्चा सुरु असून यावर उत्तराची वाट पाहिली जात आहे.

कर्जबुडवा असा शिक्का बसलेला आणि अर्थव्यवस्थेचा उडलेल्या बोझवाऱ्यामुळे पाकिस्तान आधीच संकटात आहे. त्यातच पाकिस्तानला दिलेली आर्थिक मदत आयएमएफनेही रोखली आहे. सौदीच्या या पावलामुळे पाकिस्तानच्या सेंट्रल बँकेची स्थितीही धोक्यात येणार आहे. ही बँक आता संपूर्णपणे कर्जावरच तग धरणार आहे.