१२ ऑगस्ट रोजी कोरोना प्रतिबंधक लसीची नोंदणी करणार रशिया !


मॉस्को: कोरोना प्रतिबंधक लस देणारा रशिया हा जगातील पहिला देश ठरण्याची शक्यता असून आता काही दिवसच कोरोना प्रतिबंधक लस येण्यासाठी लागणार असल्याचे वृत्त आहे. १२ ऑगस्ट रोजी मॉस्कोच्या गामलेया इन्स्टिट्यूटने तयार केलेल्या कोव्हिड-१९ (Covid-19) या लसीची नोंदणी केली जाणार आहे. ही लस या महिन्यात डॉक्टरी पेशाशी संबंधित लोकांना दिली जाणार आहे. यासंदर्भात रशियन माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, गामलेया रिसर्च इन्स्टिट्यूटचे संचालक अलेक्झेंडर गिंट्सबर्ग यांच्यासह संस्थेच्या संशोधकांनी स्वतःवर लसीची चाचणी घेतली आहे.

याबाबत माहिती देताना अलेक्झेंडर गिंट्सबर्ग यांनी असे म्हटले आहे की, या लसीची मानवी चाचणीपूर्वी संशोधकांवर चाचणी घेण्यात आली होती. पण, संचालकांच्या या वक्तव्यामुळे वादाला तोंड फुटले. गिंट्सबर्ग यांच्या वक्तव्याचा रशियन असोसिएशन ऑफ क्लिनिकल रिसर्च असोसिएशनने (आरएसीआरए) निषेध केला आहे. हे क्लिनिकल रिसर्चच्या मूलभूत मूल्यांचे सरळसरळ उल्लंघन असल्याचे आरएसीआरएने नमूद केले आहे.

दरम्यान, या लसीने त्यांच्या सर्व चाचण्या पूर्ण केल्या आहेत आणि रशियन अधिकारी ही लस मानवा देणे उपयुक्त असल्याचे मानत आहेत. ही लस या आठवड्यापर्यंत लाँच करण्याची रशियाची योजना आहे. डॉक्टरांना या महिन्यात शक्य तितक्या लवकर लस दिल्यानंतर रशियाची देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबवण्याची योजना आहे.