सचिन पायलट काँग्रेसमध्ये परतणार?, राहुल-प्रियंका गांधींची घेतली भेट

राजस्थानमध्ये दररोज वेगवेगळ्या राजकीय घटना घडताना पाहण्यास मिळत आहे. राजस्थानमधील गेहलोत सरकारविरोधात बंडखोरी करणाऱ्या सचिन पायलट यांनी आज दिल्लीत राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची भेट घेतली. राहुल-प्रियंका यांच्याशी झालेली पायलट यांची भेट काँग्रेससाठी फायदेशीर ठरल्याचे दिसून येत असून, मागील एक महिन्यांपासून हरियाणात असलेले पायलट समर्थक आमदार आता जयपूरमध्ये परतले आहेत. पायलट समर्थक भंवरलाल शर्मा यांनी देखील जयपूरमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची भेट घेतली.

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर भंवरलाल यांनी चर्चा सकारात्मक झाली व सरकार सुरक्षित असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, सरकारला कोणताही धोका नाही. पक्ष एक परिवार आहे आणि अशोक गेहलोत हे त्याचे प्रमुख आहेत. माझी अशोक गेहलोत यांच्याशी नाही तर, मुख्यमंत्र्यांसोबत क्षेत्रच्या मुद्यावरून नाराजी होती. एक-दोन दिवसात सर्व ठीक होईल. अशोक गेहलोत मुख्यमंत्री राहतील व सरकार 5 वर्षांचा कार्यकाळ पुर्ण करेल.

पायलट समर्थक आमदार म्हणाले की, आम्ही 1 महिन्यापर्यंत आमची नाराजी व्यक्त केली व आता नाराजी दूर झाली आहे. सचिन पायलट यांच्याविषयी विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, त्यांची राहुल गांधींशी चर्चा सुरू आहे.

राजस्थानच्या राजकारणात भुकंप आणणाऱ्या ऑडिओ क्लिपमध्ये देखील भंवरलाल यांचे देखील नाव आले होते. मात्र त्यांनी आपला याच्याशी काहीही संबंध नव्हता, असे म्हटले आहे.