पुन्हा एकदा भाजपमधून राष्ट्रवादीच्या नेत्यांचे पक्षांतर होण्याची शक्यता


मुंबई – काहीजण भाजपमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे १२ आमदार प्रवेश करणार असल्याची अफवा पसरवत असून या बिनबुडाच्या चर्चा आहेत. त्यावर माहिती देताना राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक सांगितले की, उलट भाजपमध्ये निवडणुकीआधी गेलेले आमदार राष्ट्रवादीत परतण्यासाठी उत्सुक असून यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. लवकरच यावर निर्णय घेऊन जाहीर केला जाईल.

विरोधक राष्ट्रवादीचे आमदार भाजपमध्ये जाणार अशी अफवा पसरवत असून, ही खोटी व निव्वळ अफवा आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीत यायला भाजपचे आमदारच इच्छुक असल्याचेही नवाब मलिक म्हणाले आहेत. याबाबत नवाब मलिक यांनी ट्विट करत राष्ट्रवादीचे आमदार भाजपमध्ये जाणार असल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर राष्ट्रवादीचे १२ आमदार भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती. यावर राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मौन सोडले असून या बातमीचे खंडण करत उलट भाजपमध्ये गेलेले नेते राष्ट्रवादीत परतण्यासाठी उत्सुक असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. तसेच त्यावर लवकरच निर्णय घेण्यात येईल असेही ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी राज्यातील विधानसभा निवडणुकीआधी भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपमध्ये ते नाराज असल्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे.