आता आयपीएल देखील होणार आत्मनिर्भर!; टायटल स्पॉन्सर्सच्या शर्यतीत रामदेवबाबांची ‘पतंजली’


चिनी मोबाईल कंपनी VIVOने यंदा क्रिकेटचा महाकुंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंडियन प्रीमिअर लीगचा टायटल स्पॉन्सर न होण्याचा निर्णय घेतल्यानंतर, आता आयपीएलचा टायटल स्पॉन्सर कोण असणार अशी चर्चा रंगलेली असतानाच, दररोज वेगवेगळी नावे समोर येत आहेत.

लडाखमधील गलवाण खोऱ्यात भारत-चीन सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीनंतर भारतातून चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरत असल्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळावरही ( बीसीसीआय) दबाव वाढत होता. त्यामुळेच आयपीएलच्या टायटल स्पॉन्सरवरुन यंदा VIVOला न घेण्याची घोषणा करण्यात आली. याच दरम्यान आता टायटल स्पॉन्सरच्या शर्यतीत रामदेव बाबा यांची पतंजली कंपनी उतरण्याचा विचार करत आहे.

देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे यंदाचा आयपीएल संयुक्त अरब अमिराती ( यूएई) येथे खेळवण्यात येणार आहे. त्याला केंद्र सरकारने तत्त्वतः मान्यता दिल्याचेही बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सागितले. तत्पूर्वी झालेल्या गव्हर्निंग काऊंसिलच्या बैठकीत 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत आयपीएल होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. पण, यंदाच्या आयपीएल टायटल स्पॉन्सरसाठी रिलायन्स जिओ, अॅमेझॉन, बायजू आदी नावं चर्चेत असताना आता पतंजलीही या शर्यतीत उतरण्याचा विचार करत आहे.

पतंजलीचे प्रवक्ता एस के तिजरवाल यांनी इकॉनॉमिक टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत यंदाच्या आयपीएलसाठी टायटल स्पॉन्सरशीप मिळवण्याचा आम्ही विचार करत आहोत. पतंजलीला जागतिक बाजारात ओळख मिळावी, यासाठी आमचा प्रयत्न आहे, असे सांगितले असून ते लवकरच यासंदर्भातील प्रस्तावही बीसीसीआयकडे पाठवणार आहेत. आयपीएलचे टायटल स्पॉन्सरचे हक्क मिळवल्यास, त्याचा फायदा आयपीएलपेक्षा त्या कंपनीलाच होणार आहे. तसेच भारताच्या आत्मनिर्भर बनण्याच्या निर्धारालाही मोठे प्रोत्साहन मिळेल, असे मत ब्रँड तज्ज्ञांनी व्यक्त केले.