प्रभू रामानंतर आता बुद्धांच्या जन्मस्थानावरून वाद, परराष्ट्रमंत्र्यांच्या वक्तव्यावर नेपाळने घेतला आक्षेप

गौतम बुद्ध यांच्याबाबत भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी केलेल्या विधानाबाबत आता नेपाळने त्यावर आक्षेप घेतला आहे. एस जयशंकर यांनी गौतम बुद्ध हे भारतीय असल्याचे म्हटले होते. यावर आता नेपाळचे म्हणणे आहे की, गौतम बुद्धांचे प्रकरण हे शंका आणि वादाच्या पलिकडे असून, याप्रकारे वादाचा विषय ठरू शकत नाही. पंतप्रधान मोदींनी देखील बुद्धांचे जन्मस्थळ नेपाळ असल्याचे म्हटले आहे.

यानंतर आता परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्टीकरण देत म्हटले आहे की, बुद्ध हे सर्वांच्याच वारशाचा भाग आहेत. त्यांचा जन्म नेपाळमध्ये झाला होता. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव म्हणाले की, यात काहीही शंका नाही की गौतम बुद्ध यांचा जन्म लुम्बिनी येथे झाला होता, जे नेपाळमध्ये आहे.

नेपाळने यावर म्हटले की, बौद्ध धर्म नेपाळनंतर जगभरातील इतर भागांमध्ये पसरला.  हे प्रकरण वाद आणि शंकेच्या पलिकडे असून, संपुर्ण आंतरराष्ट्रीय समूदायाला या गोष्टीची माहिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 साली नेपाळचा दौरा केला होता, त्यावेळी देखील त्यांनी नेपाळ शांतीप्रिय देश असून, हे बुद्धांचे जन्मस्थान आहे, असे म्हटले होते.

दरम्यान, याआधी नेपाळने प्रभू रामांवरून देखील वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. प्रभू रामाचे जन्मस्थान नेपाळ आहे, असा दावा नेपाळच्या पंतप्रधानांनी केला होता.