न्यूझीलंडने केल्या या उपाययोजना, 100 दिवसात सापडला नाही एकही कोरोना रुग्ण

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. अमेरिका, ब्राझील आणि भारतात तर दररोज हजारो नवीन रुग्म आढळत आहे. मात्र एक देश असा आहे, जेथे मागील 100 दिवसात एकही नवीन कोरोना रुग्ण आढळलेला नाही. न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांचे कोरोनाला रोखण्यासाठी एकच धोरण होते – कठोर पावले उचला आणि वेळेच्या आधी कारवाई करा. या धोरणावर न्यूझीलंडला कोरोनावर मात करणे शक्य झाले.

जेसिंडा यांनी 19 मार्चला देशाच्या सीमा परदेशी नागरिकांसाठी पुर्णपणे बंद केल्या होत्या. त्यावेळी देशात केवळ 28 रुग्ण होते. 23 मार्चला लॉकडाऊन केले त्यावेळी आकडा 102 वर पोहचला होता. अन्य देशांच्या तुलनेत न्यूझीलंडमधील लॉकडाऊन कठोर होता. येथे लॉकडाऊन दरम्यान, हॉटेल बंद होते, डिलिव्हरी सुरू नव्हती. समुद्र किनाऱ्यावर जाऊ शकत नव्हते. हे कठोर नियम जवळपास 5 आठवडे होते. यानंतर देखील दोन आठवड्यांचा लॉगडाऊन करण्यात आला.

न्यूझीलंडच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, न्यूझीलंड जेव्हा व्हायरस नष्ट करण्याबाबत बोलतो, त्यावेळी त्याला पुर्णपणे संपूण टाकल्याचा दावा करत नाही. तर न्यूझीलंड विश्वासाने सांगतो की आम्ही आमच्या समुदायातील व्हायरस संसर्गाची चेन तोडली आहे. न्यूझीलंड भविष्यातही परदेशातून व्हायरस पोहचल्यास संसर्गाची चेन तोडण्याची तयारी करत आहे. 8 जूनला न्यूझीलंडने निर्बंध हटविण्याची घोषणा केली होती. त्याआधी 17 दिवसात 40 हजार टेस्ट पैकी एक देखील पॉझिटिव्ह आढळला नव्हता. जूननंतर येथील स्थिती अगदी सामान्य झाली व सध्या येथे लॉगडाऊनची गरज देखील नाही.

लॉकडाऊन दरम्यान न्यूझीलंड सीमा सुरक्षेबाबत कठोर होता. केवळ देशाच्या नागरिकांनाच बाहेरून येण्याची परवानगी होती व तेही दोन आठवडे क्वारंटाईन होण्याच्या अटीवरच शक्य होते. न्यूझीलंड एक बेट असल्याने, या देशाची सीमा दुसऱ्या देशाशी लागत नाही. त्यामुळे भौगोलिक स्थितीची देखील या देशाला फायदा झाला.

जगभरात कोरोनापासून वाचण्यासाठी मास्कवर जोर देण्यात आला. मात्र न्यूझीलंडमध्ये मास्कने जास्त महत्त्वाची भूमिका बजावली नाही. पंरतू, आता सरकार घरात मास्क ठेवण्यास सांगत आहे, जेणेकरून संसर्ग पसरल्यास त्याचा वापर करता येईल. जवळपास 50 लाख लोकसंख्या असलेल्या या देशात आतापर्यंत केवळ 22 लोकांचा मृत्यू झाला आहे. एकूण संक्रमितांची संख्या जवळपास 1200 असून, त्यातील केवळ 32 एक्टिव्ह केस आहेत. मागील 100 दिवसात एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही.