देशासाठी सुवर्ण पदक मिळवणाऱ्या खेळाडूवर आली भाजी विकण्याची वेळ

झारखंडच्या रांची येथील अरगोडा चौकाजवळ राहणाऱ्या अमरदीप कुमारने थ्रो बॉलच्या एका आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले होते. छोट्याशा गावातून येऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्ण पदक जिंकत अमरदीपने आपल्या देश आणि राज्याचे नाव रोशन केले. त्याच्यासाठी हा प्रवास मात्र सोपा नव्हता. आता कोरोना व्हायरस संकटाच्या काळात हा खेळाडू भाजी विकून आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करत आहे.

Image Credited – Aajtak

वर्ष 2017 मध्ये अमरदीपला एका स्पर्धेसाठी नेपाळला जायचे होते. मात्र त्याच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे त्याच्या आईने सोने गहाण ठेवले. त्याच स्पर्धेमध्ये त्याने देशासाठी सुवर्ण पदक पटकावले. यावर्षी अमेरिकेत होणाऱ्या एका स्पर्धेत देखील तो भाग घेणार होता, मात्र कोरोनामुळे ही स्पर्धा रद्द झाली. अमरदीप आता घरातच सराव करतो आणि घराचा खर्च भागवण्यासाठी भाजी विकत आहे.

Image Credited – Aajtak

आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या अमरदीपला सध्या मदतीची आवश्यकता आहे. मात्र त्याला क्रिडा प्रशासनाकडून मदत मिळताना दिसत नाही. अमरदीपचे म्हणणे आहे की, या कठीण काळात त्याला भाजी विकण्यासोबतच गाडी देखील चालवावी लागत आहे. त्यामुळे त्याला अभ्यास आणि सरावावर लक्ष देता येत नाही.