बॉयकॉट चायना फ्लॉप ? मोठ्या प्रमाणात आयात करत आहे भारत, चीनचा दावा

कोरोना संकटाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारताचा नारा दिला. उद्योग जगतापासून ते सर्वसामान्यांपर्यंत सर्वांना देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी हातभार लावावा असे मोदींनी म्हटले. भारत आत्मनिर्भर झाल्यास आयात घटेल. मात्र भारत आयात कमी करून, निर्यातीवर जास्त लक्ष केंद्रीत करत असल्याने चीनची मात्र आगपाखड होत आहे. भारताने गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर चीनी अ‍ॅप्सवर बंदी घालतानाच, दोन्ही देशातील व्यापारावर देखील मोठा परिणाम झाला आहे.

देशात चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात आहे, लोक मेड इन इंडिया वस्तू खरेदी करत आहेत. यामुळे चीन चांगलाच भडकला असून, दावा करत आहे की, चीनमधून भारताची आयात कमी झाली नसून, वाढली आहे.

चीनचा सरकारी मीडिया ग्लोबल टाईम्सनुसार, भारतातील चीनी वस्तूंच्या बहिष्कारामुळे त्यांच्या व्यवसायावर कोणताही परिणाम झालेला नाही. भारतात विरोधानंतरही आयात वाढली असल्याचा दावा केला आहे. परंतू चीननेच जो डेटा दिला आहे, तो भारताच्या डेटाशी जुळत नाही. चीनी मीडियाचे म्हणणे आहे की, कोरोना काळात आयात कमी होण्याऐवजी उलट वाढली आहे. चीनी कस्टम डेटानुसार, एप्रिल महिन्यात भारताने 3.22 अब्ज डॉलर्सच्या वस्तू आयात केल्या. तर मे मध्ये हा आकडा वाढून 3.25 अब्ज डॉलर्सवर पोहचला. जूनमध्ये 4.78 अब्ज डॉलर्स, तर जुलैमध्ये तब्बल 5.6 अब्ज डॉलर्सवर गेला.

मात्र हा चीनी मीडियाचा दावा असून, भारताचे आयात आकडे याच्याशी जुळत नाही. भारताच्या कॉमर्स मिनिस्ट्रीनुसार, एप्रिल महिन्यात चीनकडून 3.03 अब्ज डॉलर्सचे आयात करण्यात आले. मे महिन्यात 4.46 अब्ज डॉलर्स, जूनमध्ये 3.32 अब्ज डॉलर्स आहे. चीनी सरकारच्या कस्टम विभागाचा आणखी एक डेटा पाहिल्यावर आढळते की, भारताच्या आयातीमध्ये घट झाली आहे.

भारताने जानेवारी ते जुलै 2020 पर्यंत चीनसोबत 43.47 बिलियन डॉलर्सचा व्यवहार केला असून, मागील वर्षी याच कालावधीच्या तुलनेत यात 18.6 टक्के घट झाली आहे.