लवकरात लवकर सुरु होणार किल्ले विजयदुर्गाच्या संवर्धनाचे काम; संभाजीराजेंची माहिती


विजयदुर्ग किंवा घेरिया हा महाराष्ट्रातील एक किल्ला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेला विजयदुर्ग हा एक जलदुर्ग आहे. हा किल्ला मुंबईच्या दक्षिणेस सुमारे २२५ किलोमीटरवर व गोव्याच्या उत्तरेस १५० किलोमीटरवर आहे. सुमारे १७ एकर जागेत हा किल्ला पसरला आहे. या किल्ल्यास तीन तटबंदी आहेत. त्यास चिलखती तटबंदी असे म्हणतात. याच्या तीन बाजू पाण्याने घेरलेल्या आहेत. या किल्ल्यात दोन भुयारी मार्ग आहेत. पूर्वेकडील जिब्राल्टर असेही विजयदुर्गला म्हणत कारण हा एक अजिंक्य किल्ला होता. ४० किलोमीटर लांब असलेली वाघोटन खाडी हे या किल्ल्याचे बलस्थान आहे. कारण मोठी जहाजे खाडीच्या उथळ पाण्यात येऊ शकत नसत आणि मराठी आरमारातील छोटी जहाजे या खाडीत नांगरून ठेवली जात, पण ती समुद्रावरून दिसत नसत.

नावाप्रमाणेच विजयी झेंडा फडकवणारा विजयदुर्ग म्हणजे जलदुर्गाचा बादशहाच जणू! इंग्रज, पोतुगीज, डच इ. परकीय शत्रूंच्या तोफांचा महाभयंकर मारा खाऊनही आपल्या वास्तूचा एकही दगड ज्या किल्ल्याने जागचा हालू दिला नाही, असा मिश्रदुर्ग म्हणजेच विजयी विजयदुर्ग हा किल्ला. हा किल्ला छत्रपतींनी जिंकण्याअगोदर तो ५ एकरात वसलेला होता. पण किल्ला महाराजांनी ताब्यात घेतल्यावर किल्ल्याच्या सभोवती चिलखती तटबंदी उभारली आणि किल्ल्याचे क्षेत्रफळ १७ एकर १९ गुंठे झाले.

या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे यावर असलेल्या अनेक वास्तू आजही बऱ्यापैकी सुस्थितीत असल्यामुळे या ऐतिहासिक वास्तूंचे जतन व संवर्धन करणे गरजेचे आहे. शासनाने रायगड विकास प्राधिकरणांतर्गत विजयदुर्ग किल्ला दिल्यास, या किल्ल्याची जवळपास 80 टक्के पुनर्बांधणी करुन घेता येईल, असे खासदार संभाजीराजेंनी म्हटले आहे.

समुद्रात असलेल्या अनेक किल्ल्यांपैकी हा एकमेव असा आहे, ज्याच्या भिंती आजही तटावर भक्कमपणे उभ्या आहेत. त्यामुळे पुनर्बांधणीची संधी रायगड विकास प्राधीकरणाला मिळावी, अशी इच्छा संभाजीराजेंनी व्यक्त केली आहे. राज्य सरकार असो वा केंद्र सरकार, केवळ मुंबई व दिल्लीतील वातानुकूलित कार्यालयात बसून, पत्र लिहून किल्ल्यांचे संवर्धन होणार नाही. किल्ल्यांवर प्रत्यक्ष जाऊन, पाहणी करुन, बारकाईने अभ्यास करुनच आपण आपला सांस्कृतिक ठेवा पुढच्या पिढीला बघण्यासाठी जपून ठेऊया, असे संभाजीराजेंनी म्हटले आहे.

आज अस्तित्वासाठी मराठा आरामाराचे प्रमुख केंद्र असलेला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी पुनर्बांधणी करून घेतलेला विजयदुर्ग झगडत आहे. पाहणीसाठी विजयदुर्ग किल्ल्यास खासदार संभाजीराजे भोसले यांनी भेट दिली. त्यावेळी, याआधी दोनदा दिल्लीत जाऊन सर्व त्या परवानग्या घेतल्या असून लवकरात लवकर किल्ले विजयदुर्गाचे काम सुरू होईल, असे संभाजीराजेंनी सांगितले.