जाणून घ्या हेल्मेटबाबत सोशल मीडियात व्हायरल झालेल्या ‘त्या’ मेसेज मागील सत्य


नवी दिल्ली – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन जाहिर करण्यात आला. लॉकडाऊनमुळे देशभरातील नागरिक घरातच असल्यामुळे सोशल माडिया प्लॅटफॉर्मचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. पण या सोशल मीडियामुळे नागरिकांना जसे फायदे देखील होत तसे तोटे देखील होत आहेत. याच काळात अनेक मेसेज व्हायरल झाले, त्यापैकी बहुतांश मेसेज फेक होते. त्यामुळे व्हायरल होणारे मेसेज इतरांना पाठवण्याआधी त्याची सत्यता तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे. देशभरात बाईक चालवताना चालकाच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट घालण्याचा सल्ला देण्यात येतो. पण घरापासून 15 किमी अंतरापर्यंत गाडी चालवताना हेल्मेटची गरज नसल्याचे सांगणारा एक मेसेज सध्या सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे.

पण याबाबत अधिक चौकशी केली असता हा मेसेज फेक असल्याचे समोर आले आहे. या मेसेजची सत्यता तपासली असता हेल्मेटबाबत व्हायरल होत असलेला हा मेसेज फेक असल्याची माहिती मिळाली आहे. हा व्हायरल होणारा मेसेज फेक असल्याचे प्रेस इन्फर्मेशन ब्युरोनेही (पीआयबी) सांगितले आहे. अंतर कितीही असो हेल्मट घालणे सक्तीचे असल्यामुळे अशा फेक मेसेजवर विश्वास ठेवू नका, त्याचबरोबर आपल्याला आलेल्या कोणत्याही मेसेजची सत्यता पडताळून घ्या.

याबाबतची माहिती पीआयबीने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे. न्यायालयाने हा निर्णय सागर कुमार जैन नावाच्या व्यक्तीने दाखल केलेल्या याचिकेवर दिला असून व्हॉट्सअ‍ॅपवर जैन यांच्या याचिकेचा हवाला देत हेल्मेटचा मेसेज व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये महानगरपालिका किंवा नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रांच्या 15 किमीच्या आतमध्ये लोकांना हेल्मेट घालणे बंधनकारक राहणार नसल्याचे म्हटले आहे. पण हा मेसेज फेक असल्याचे आता समोर आलं आहे.

अशा खोट्या मेसेजवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. बाईक चालवताना हेल्मेट वापरणे आपल्या सुरेक्षेसाठी अत्यंत गरजेचे आहे. लोकांनी हेल्मेटबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच अशी खोटी माहिती पसरवणारे मेसेज इतरांना पाठवू नये, असे देखील त्यांनी म्हटले आहे.