कर्नाटकातील काँग्रेसच्या आमदाराने हटवला शिवाजी महाराजांचा पुतळा – आशिष शेलार


मुंबई: कर्नाटक सरकारने बेळगावच्या मतगुत्ती गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्यानंतर सुरु झालेले राजकारण आता चांगलेच तापले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी या घटनेनंतर भाजपवर आगपाखड केली होती. तसेच भाजपचे कर्नाटकात सरकार असताना राज्यातील विरोधी पक्ष गप्प का बसला आहे, असा सवालही शिवसेना नेते संजय राऊत यांनी उपस्थित केला होता. भाजप नेते आशिष शेलार यांनी या टीकेला प्रत्युत्तर दिले. त्यांनी म्हटले की, कर्नाटकातील मनगुत्ती येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा रातोरात हटवल्याच्या घटनेचा आम्ही जाहीर निषेधच करतो.

पण, स्थानिक काँग्रेस आमदार सतिश जारकीहोळी यांचा दबाव छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा हटवण्यासाठी कारणीभूत असल्याचा दावा शेलार यांनी केल्यामुळे आता शिवसेना कर्नाटकात जाऊन काँग्रेसच्या स्थानिक आमदाराविरोधात आंदोलन करणार का, असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला. तसेच आम्ही बेळगावात विरोधी पक्ष नेत्यांसोबत आंदोलन करायला तयार असल्यामुळे ते येणार का?, अशी खोचक टिप्पणी करणाऱ्या संजय राऊत यांच्यावरही शेलार यांनी पलटवार केला. छत्रपतींसाठी आंदोलन करायचे झाल्यास त्यासाठी शिवसेनेला विरोधी पक्षनेता आणि भाजपच्या परवानगीची गरज का लागते, असा सवालही शेलार यांनी विचारला. तसेच शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा त्याची जागी बसवला जावा, अशी मागणीही आशिष शेलार यांनी केली.