‘अमृताबाई, पोलिसांविषयी जरा सबुरीने घ्या…’; माजी पोलीस अधिकाऱ्याचे पत्र


मुंबई – एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने निर्दोष आणि स्वाभिमानी नागरिकांसाठी आता मुंबईत राहणे अजिबात सुरक्षित नसल्याची प्रतिक्रिया देणाऱ्या राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना खुले पत्र लिहिले आहे. त्यांनी यामध्ये ‘अमृताबाई फडणवीस, पोलिसांविषयी जरा सबुरीने घ्या…’ असा सल्ला दिला आहे. सध्या सोशल मीडियावर हे पत्र व्हायरल झाले आहे.

मागील काही दिवसांपासून मुंबई पोलीस विरुद्ध बिहार पोलीस असा संघर्ष सुशांत सिंह प्रकरणावरुन पहायला मिळत आहे. या तपासासंदर्भात विरोधकांकडून प्रश्न उपस्थित करत सरकारवर टीका केली जात आहे. असे असतानाच अमृता फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये असुरक्षित वाटत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली होती. ज्या प्रकारे सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सुरू आहे, त्यावरून मला असे वाटते की मुंबईने माणुसकी गमावली आहे. निर्दोष आणि स्वाभिमानी नागरिकांसाठी आता मुंबईत राहणे अजिबात सुरक्षित नसल्याचे ट्विट अमृता फडणवीस यांनी केले होते.

आता याच प्रकरणावरुन अमृता यांना निवृत्त पोलीस अधिकारी विश्वास कश्यप यांनी पत्र लिहिले आहे. कश्यप यांनी २३ वर्ष मुंबई पोलीस दलात सेवा केल्यानंतर सेवानिवृत्ती घेतली. १९९२ मध्ये एमपीएससीमधून कश्यप यांची पीएसआयपदी नेमणूक झाली होती. पण सेवेची १५ वर्षे शिल्लक असतानाच त्यांनी २०१४ मध्ये सेवानिवृत्ती घेत पूर्णवेळ उच्च न्यायालयात वकिली करण्याचा निर्णय घेतला. अमृता यांना सल्ला देणारे एक पत्र याच कश्यप यांनी फेसबुकवर पोस्ट केले आहे.

*अमृताबाई फडणवीस ,* *पोलिसांविषयी जरा सबुरीने घ्या ….*सौ . अमृताबाई फडणवीस ,पत्नी माजी मुख्यमंत्री,महाराष्ट्र…

Posted by Vishwas Kashyap on Friday, August 7, 2020

अमृता फडणवीस यांच्या त्या या ट्विटवरुन चांगला वाद निर्माण झाला होता. फडणवीस सरकार गेली पाच वर्ष होते. पोलीसदेखील तेच होते. सरकार बदलले म्हणजे पोलीस बदलत नाहीत. ज्या पोलिसांच्या सुरक्षेत गेली पाच वर्ष त्या होत्या आणि आहेत त्यांच्यावर अविश्वास असेल तर त्यांनी खुशाल राज्य सोडून द्यावे, असं शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हटले होते.

त्यांनी गेली पाच वर्ष पोलिसांची सुरक्षा घेतली. पाच वर्षात फडणवीस सरकारने पोलिसांना सतत शाबासकी दिली, त्यांच्या मागे ठामपणे उभी राहिले. फक्त खूर्ची गेली म्हणून असुरक्षित वाटत असेल तर त्यांच्याकडे राज्य सोडणे हा एकच पर्याय असू शकतो. मुंबईच्या कोणत्याही नागरिकाने आम्ही असुरक्षित असल्याचे म्हटलेले नाही. अमृता फडणवीस यांना असुरक्षित वाटण्यासारखे असे काय घडले आहे?, अशी विचारणा अनिल परब यांनी केली होती.