बैरुतच्या मदतीसाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला हा निर्णय

लेबनानची राजधानी बैरुत येथे अमोनियम नायट्रेटच्या स्फोटामुळे संपुर्ण देश हदरला. या घटनेत शेकडो लोकांचा मृत्यू झाला, तर जवळपास 4 हजारांपेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. आता अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प बैरुतच्या मदतीसाठी पुढे आले आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, बैरुतच्या या विशाल स्फोटानंतर लेबनानच्या मदतीसाठी बोलण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कॉन्फ्रेंस कॉलमध्ये भाग घेणार आहे. फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रोन हे या कॉन्फ्रेंस कॉलचे आयोजक आहेत. ट्रम्प यांनी मॅक्रोन यांच्याशी देखील याबाबत चर्चा केली व यानंतर ट्विट करत प्रत्येकजण मदत करू इच्छित आहे, असे म्हटले.

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, कॉन्फ्रेंस कॉलवर राष्ट्रपती मॅक्रोन, लेबनानचे नेते आणि जगभरातील विविध देशातील नेत्यांशी चर्चा करणार आहे. त्यांनी माहिती दिली की, अमेरिकेचे तीन विमान मदत सामग्री घेऊन लेबनानला जाणार आहेत. या टीममध्ये बचाव दल आणि आरोग्य कर्मचारी असतील.

दरम्यान, संयुक्त राष्ट्राने बैरुतच्या स्फोटाबाबत माहिती देताना सांगितले की बैरुतमध्ये जवळपास 3 लाख लोक बेघर झाले आहेत. हजारो लोक आपल्या कुटुंबापासून वेगळे झाले आहेत. इराण, सौदी अरेबिया, यूएई, फ्रान्स, कुवैत, रशिया आणि कतारने लेबनानला मदत पाठवली आहे. इतर देश देखील मदत करत आहेत.