भारतात अवघ्या 225 रुपयांमध्ये मिळणार ऑक्सफोर्डची कोरोना लस!

कोरोना व्हायरसवरील लस शोधण्याचे काम अनेक देशांमध्ये सुरू आहे. यात सर्वात आघाडीवर अमेरिकेची मॉडर्ना, रशिया आणि ऑक्सफोर्ड यूनिव्हर्सिटी प्रमूख आहे. लसीचे उत्पादन करणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या भारताच्या सीरम इंस्टिट्यूटने देखील कोरोना लसीच्या उत्पादनासाठी ऑक्सफोर्ड यूनिव्हर्सिटीसोबत करार केलेला आहे.

ऑक्सफोर्डची लस ट्रायलमध्ये यशस्वी झाल्यानंतर सीरम इंस्टिट्यूट भारतात मोठ्या प्रमाणात याचे उत्पादन करणार आहे. या कंपनीचे सीईओ अदर पूनावाला यांनी काही दिवसांपुर्वी माहिती दिली होती की भारतात ही लस कोव्हिशिल्ड नावाने विकली जाईल व याची किंमत 1 हजार रुपयांपेक्षा कमी असेल. आता इकोनॉमिक टाईम्सनुसार, सीरमची कोरोना प्रतिंबधक लस भारतात केवळ 225 रुपयांना विकली जाणार आहे. लसीला मंजूरी मिळाल्यानंतर काही देशांमध्ये ही लस केवळ 3 डॉलर्स म्हणजेच जवळपास 225 रुपयांमध्ये विकली जाईल.

लस स्वस्तात उपलब्ध व्हावी यासाठी गेट्स फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे. फाउंडेशन लस निर्माण करणाऱ्या कंपन्यांना जवळपास 150 मिलियन डॉलर्सचा निधी देत आहे. याच पैशातून सीरम उत्पादन करत असलेली लस स्वस्तात उपलब्ध केली जाईल.

दरम्यान, ऑक्सफोर्ड यूनिव्हर्सिटीच्या लसीला मागील आठवड्यात दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल करण्यासाठी परवानगी मिळाली आहे.