‘100 टक्के प्रभावी नसली तरीही लोकांना टोचणार कोरोनाची लस’

जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसवरील लस शोधण्याचे काम वेगाने सुरू आहे. अमेरिका, ब्रिटन, चीनच्या लसी शेवटच्या टप्प्यात आहेत. त्यामुळे त्या लवकरच बाजारात येण्याची देखील शक्यता आहे. मात्र या लसी किती प्रभावी आहेत, हे बाजारात आल्यावरच कळेल. याच पार्श्वभूमीवर अमेरिकन सरकारचे कोरोना व्हायरस एडवाइजर आणि देशातील प्रमूख संसर्गरोग विशेषज्ञ अँथनी फाउची यांनी लस 100 टक्के प्रभावी नसली तरी टोचली जाईल असे म्हटले आहे.

अँथनी म्हणाले की, कोरोना लस पुर्णपणे प्रभावी (98 टक्के) होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे लस 50 टक्के जरी प्रभावी असली तरीही स्विकारली जाईल असे म्हटले आहे. ते म्हणाले की, वैज्ञानिक ज्या लसीवर काम करत आहेत, त्या लसी कमीत कमी 75 टक्के प्रभावी असतील, अशी आशा आहे. मात्र 50-60 टक्के प्रभावी असेल तरीही चालेल.

एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, कोरोना लस 98 टक्के प्रभावी होण्याची शक्यता खूप कमी आहे. तुम्ही हा विचार केला पाहिजे की लस एक टूल आहे. ज्याद्वारे महामारीवर नियंत्रण आणता येईल. अमेरिकेच्या फूड अँड ड्रग्स अ‍ॅडमिनिस्ट्रेशनने देखील लस सुरक्षित सिद्ध झाली व 50 टक्के प्रभावी असल्यास मंजूरी दिली जाईल असे म्हटले आहे.