देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरे टॉप-5 मध्ये

देशातील विविध राज्यातील सरकारांच्या कामकाजाबाबत केलेल्या सर्वेक्षणात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले आहे. आज तकने हे सर्वेक्षण केले असून, लोकांना देशातील वेगवेगळ्या राज्यातील तेथील सरकारच्या शासनाबाबत प्रश्न विचारण्यात आले. सर्वेक्षणामध्ये 24 टक्के लोकांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पसंती दिली. जानेवारीमध्ये आदित्यनाथ यांची लोकप्रियता 18 टक्के होती. जी आता वाढल्याचे दिसून येत आहे.

आज तकच्या या सर्वेक्षणात दुसऱ्या क्रमांकावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आहेत. तिसऱ्या क्रमांकावर आंध्र प्रदेशचे जगन मोहन रेड्डी, चौथ्या क्रमांकावर पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी आणि पाचव्या क्रमांकावर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आहेत.

यानंतर क्रमशः ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक (6%), तेलंगानाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (3%), छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (2%), गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी (2%), राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत (2%) आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस येदियुरप्पा (2%) हे आहेत.

राज्यातील जनतेला जेव्हा त्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीबद्दल विचारले, तेव्हा त्यात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले. सर्वेक्षणातील 87 टक्के लोकांना त्यांचे काम आवडले. तर महाराष्ट्रात 55 टक्के लोकांना उद्धव ठाकरे यांचे काम आवडले.