बबिता फोगाटवर सरकार ऐवढे मेहरबान का? सुवर्णपदक विजेत्या खेळाडूची भाजपवर टीका


नवी दिल्ली – मागील वर्षात भारतीय जनता पक्षात भारताची स्टार कुस्तीपटू बबिता फोगाटने अधिकृत प्रवेश केल्यानंतर सोशल मीडियावर बबिता पूर्वीपेक्षा अधिक सक्रिय झाली. बबिता सोशल मीडियावर सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या कामांची स्तुती करतानाही दिसते. हरयाणा सरकारने नुकतीच तिची क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या उप संचालकपदी नियुक्ती केली. आशिया स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या मनजीत सिंग चहल याने त्यावरून प्रश्न उपस्थित केला आहे.

मनजीत सिंग चहलने 2018च्या आशिया स्पर्धेत 800 मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले आहे. बबिता फोगाटच्या नियुक्तीवरून त्याने हरयाणा सरकारवर टीका केली आहे. ही इतरांना डावलून केलेली ही नियुक्ती योग्य आहे का, असा सवालही त्याने केला आहे. तो म्हणाला, एखाद्या महिलेची या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती होणे, ही चांगली गोष्ट आहे, पण त्यासाठी आम्हाला का वगळण्यात आले? आम्ही देखील बेरोजगार आहोत. माझ्याकडे आशिया स्पर्धेपूर्वी नोकरी नव्हती आणि आताही हरयाणा सरकारकडे मी नोकरीसाठी झगडत आहे. ऑलिम्पिकची तयारी मी करू की हरयाणा सरकारकडे नोकरीसाठी संघर्ष करू? माझी फाईल दोन वर्ष झाले असून ती अद्याप तिथेच धूळ खात पडली आहे.

हरयाणा राज्याच्या क्रीडा धोरणाचे देशात कौतुक केले जाते, पण याही मुद्द्यावर मनजीतने स्पष्ट मत मांडले. तो म्हणाला, राज्याचे क्रीडा धोरण चांगले आहे, पण आतापर्यंत किती अॅथलिट्सना नोकरी दिली गेली? कबड्डीपटू कविता आणि कुस्तीपटू बबिता वगळता कोणाला नोकरी दिली, हे हरयाणा सरकारने सांगावे. 40-50 खेळाडू नोकरीसाठी सरकार दरबारी रोज फेऱ्या मारत आहेत, पण त्यांना कुणीच दाद देत नाही.

हरयाणा सरकारने क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या उप संचालकपदी बबिता आणि कबड्डीपटू कविता देवी यांची नियुक्ती केली आहे. बबिताने या पदासाठी 2018मध्ये अर्ज केला होता. बबिता हरयाणा पोलीस दलात सब इन्स्पेक्टर होती, पण तिने राजकारणात प्रवेश करण्यासाठी नोकरी सोडली. हरयाणा सरकारने जाहीर केलेले बक्षीस मनजीतला मिळाले, परंतु अजुनही तो पोलीस दलात नोकरीच्या प्रतीक्षेत आहे. दोन वर्ष झाली, तरी त्याची फाईल पुढे सरकलेली नाही.