ट्विटरवर सोनू सूदकडे मुलाने केली व्हिडीओ गेमची मागणी, अभिनेत्याने दिले भन्नाट उत्तर

बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने कोरोना व्हायरस महामारीमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये हजारो कामगारांसाठी मदतीचा हात पुढे करत, त्यांना घरी जाण्यास मदत केली. यानंतर त्याने अनेकांना नोकरी मिळावी यासाठी देखील प्रयत्न सुरू केले आहेत. सोशल मीडियावर अनेकजण त्याच्याकडे मदत मागत असतात. मदतीचे ट्विट करत असतात. मात्र काहीजण असेही असतात, जे भलत्याच गोष्टीची मागणी करायला देखील मागे पुढे पाहत नाही.

Image Credited – scoopwhoop

अशाच एका दहावीच्या विद्यार्थ्याने ट्विट करत सोनू सूदकडे खाजगी वस्तू मागितली. निलेश नावाच्या या मुलाने सोनूला टॅग करत लिहिले की, सर, तुम्ही मला पीएस4 (प्ले स्टेश) देऊ शकता का. लॉकडाऊनमध्ये माझे सर्व मित्र गेम खेळत आनंद घेत आहेत.

यावर सोनू सूदने दिलेल्या उत्तराने सर्वांचेच मन जिंकले. सोनू सूदने मुलाला उत्तर देत लिहिले की, जर तुझ्याकडे पीएस4 नसेल, तर तू नशीबवान आहे. काही पुस्तके घे आणि वाच. मी तुझ्यासाठी हे नक्कीच करू शकतो.

सोनूचे हे ट्विट चांगलेच व्हायरल झाले. अनेक युजर्सनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. यानंतर मुलाने देखील ट्विट करत आपण नक्कीच पुस्तके वाचू असे वचन दिले. मात्र त्याने आपले आधीचे ट्विट डिलीट केले होते. परंतू ते आधीच सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.