रियाने वकिलांद्वारे ईडीच्या चौकशीपूर्वी केली ‘ही’ मागणी


मुंबई – सुशांतची कथित प्रेयसी रिया चक्रवर्ती हिला सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी ईडीने नोटीस बजावली होती. त्यानुसार रियाची आज चौकशी होणार आहे. पण रियाने तत्पूर्वी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असेपर्यंत ईडीसमोर जबाब नोंदवण्यात येऊ नये, अशी विनंती केल्याची माहिती तिच्या वकिलांनी दिली आहे.

रियाने सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असेपर्यंत ईडीसमोर जबाब नोंदवण्यात येऊ नये, अशी विनंती केल्याचे तिचे वकील सतीश मानशिंदे यांनी सांगितले आहे. १५ कोटी रुपये सुशांतच्या खात्यामधून काढल्याचा आरोप रियावर करण्यात आल्यामुळे याच प्रकरणी रियाची आज चौकशी होणार आहे.

दरम्यान, रिया चक्रवर्तीविरोधात सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी तक्रार दाखल केली होती. त्यांनी या तक्रारीमध्ये रियाने घर सोडताना घरातील रोख रक्कम, दागिने, लॅपटॉप, क्रेडिट कार्ड आणि सुशांतच्या वैद्यकीय सूचनांची कागदपत्रे सोबत नेल्याचे म्हटले होते. तसेच सुशांतच्या खात्यामधील १५ कोटी रुपये देखील रियाने काढल्याचा आरोप त्यांनी केला होता. बिहार पोलिसांच्या एफआयआरच्या आधारे ईडीने रियाविरोधात मनी लॉन्ड्रिंगच्या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यामुळे चौकशीसाठी आज रियाला ईडीसमोर हजर राहावे लागणार आहे.