लॉकडाऊनचा असाही उपयोग, या राज्यपालांनी 5 महिन्यात लिहिली तब्बल 13 पुस्तके

मागील 4-5 महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे लोक घरात कैद आहेत. लोकांकडे भरपूर वेळ असल्याना याचा सदुपयोग देखील केला आहे. मिझोरमच्या राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई यांनी देखील लॉकडाऊनमधील मोकळा वेळ सार्थकी लावला आहे. त्यांनी मार्चपासून आतापर्यंत तब्बल 13 पुस्तके लिहिली आहेत. यात इंग्रजी आणि मल्याळम भाषेत लिहिलेल्या कवितासंग्रहांचा देखील समावेश आहे.

याविषयी पिल्लई म्हणाले की, लॉकडाऊनमध्ये पुस्तके वाचणे आणि लिहिण्यासाठी त्यांना भरपूर मोकळा वेळ मिळाला. राजभवनात कोणाला येण्याची परवानगी नव्हती. लोकांसोबत संपर्क देखील बंद होता. यामुळे वाचण्यास आणि लिहिण्यास जास्त वेळ मिळाला.

त्यांनी सांगितले की, मी सकाळी 4 वाजता उठायचो आणि व्यायाम केल्यानंतर वाचन आणि लिहिण्यास सुरुवात करायचो. मिझोरमचे मुख्यमंत्री जोरामथंगा शनिवारी एका कार्यक्रमात  त्यांच्या काही पुस्तकांचे प्रकाशन करणार आहेत. पिल्लई यांचे पहिली पुस्तक 1983 साली प्रकाशित झाले होते. राज्यपाल होण्याआधी त्यांची 105 पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.