इंटेलवर सायबर हल्ला, 20 जीबी डेटा ऑनलाईन लीक

प्रमुख चिपसेट कंपनी इंटेलवर सायबर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. या हॅकिंगमध्ये हॅकर्सने 20जीबी डेटा चोरी केला असून, यात महत्त्वाच्या माहितीचा समावेश होता. अद्याप हे हॅकिंग कोणी केले हे समोर आलेले नाही. रिपोर्टनुसार, चोरी झालेल्या डेटामध्ये गोपनीय माहिती होती.

लीक डेटामध्ये BIOS कोड आणि डी-बगिंग कोडचा देखील समावेश आहे. सुरुवातीच्या तपासात हा डेटा इंटेल रिसोर्स आणि डिझाईन सेंटरमधून लीक झाल्याचे आढळले आहे. स्विस सॉफ्टवेअर डेव्हलपर टिल कोट्टमन यांनी इंटेलचा डेटा लीक झाल्याची माहिती ट्विट करत दिली. कोट्टमन यांनी सांगितले की, या वर्षीच्या सुरुवातीलाच त्यांना एका हॅकरकडून या हॅकिंगबाबत माहिती मिळाली होती.

समोर आलेल्या स्क्रिनशॉटनुसार चोरी झालेल्या डेटामध्ये इंटेलचा रोडमॅप आणि गोपनीय माहितीसोबतच प्रोसेसरच्या अनेक व्हर्जनसंदर्भातील माहितीचा समावेश आहे. याशिवाय यात काही मार्केटिंग टेंप्लेट्स देखील आहेत.