इंग्रजांच्या काळातील जुनाट नियम भारतीय रेल्वेने केला बंद

भारतीय रेल्वेने इंग्रजांच्या काळातील एक नियम बदलला आहे. या बदलामुळे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना समस्या होऊ शकते. आता रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या आवासावर काम करणाऱ्या बंगला पियून किंवा टेलिफोन अटेंडेटसह डाक खलासीच्या (टीएडीके) पदावर आता कोणतीही भरती होणार नाही.

रेल्वे बोर्डाने यासंदर्भात आदेश जारी केला आहे. रेल्वेमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांना बंगला शिपाई किंवा टेलिफोन अटेंडेंटच्या नियुक्तीचा अधिकार असतो. या कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी कोणतीही परीक्षा होत नसे. म्हणजेच रेल्वे अधिकारी आपल्याला हवे त्या, आपल्या मर्जीतील व्यक्तीची नियुक्ती करू शकायचे.

रेल्वे बोर्डाने आदेशात म्हटले आहे की, टीएडीकेच्या पदासाठी आता नवीन लोकांची नियुक्ती केली जाणार नाही. आदेशानुसार 1 जुलै 2020 पासून अशा प्रकारच्या नियुक्तीसाठी देण्यात आलेल्या मंजूरीच्या प्रकरणाची समिक्षा केली जाईल. रेल्वेने बोर्डाने म्हटले आहे की सर्व रेल्वे कार्यालयांमध्ये याचे सक्तीने पालन केले जावे.