‘शाओमी’च्या Mi Browser वर भारताची बंदी


नवी दिल्ली – चीनविरोधात सीमेवर झालेल्या संघर्षानंतर युजर्सच्या सुरक्षेच्या कारणास्तव गेल्या काही दिवसांपासून चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली जात असतानाच भारत सरकारने चिनी स्मार्टफोन कंपनी शाओमीच्या स्मार्टफोन्समध्ये वापरल्या जाणाऱ्या Mi Browser Pro वर बंदी घातली आहे.

भारत सरकारने जून महिन्याच्या अखेरीस ५९ लोकप्रिय चिनी अ‍ॅप्स बंदी घातल्यानंतर सरकारने २७ जुलै रोजी अजून ४७ चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातल्याचे वृत्त होते. शाओमीच्या Mi Brower Pro चाही त्या ४७ अ‍ॅप्सच्या यादीत समावेश आहे. यापूर्वी बंदी घालण्यात आलेल्या ५९ अ‍ॅप्समध्येही शाओमीच्या Mi कम्युनिटी अ‍ॅप आणि Mi Video अ‍ॅपवर बंदी होती. त्यामुळे हे तिन्ही अ‍ॅप्स आता भारतात वापरता येणार नाही. ही अॅप्स गुगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोअरवरुनही हटवण्यात आली होती.

Mi Browser Pro App शाओमीच्या फोनमध्ये प्री-इंस्टॉल म्हणजे आधीपासूनच असते, यात पोको, रेडमी आणि Mi स्मार्टफोन्सचाही समावेश आहे. हे अ‍ॅप ज्यांच्या फोनमध्ये प्री-इस्टॉल आहे त्यांना अजूनही याचा वापर करता येत आहे. पण थोड्याच दिवसांमध्ये अन्य चिनी अ‍ॅप्सप्रमाणे हे अ‍ॅपही ब्लॉक केले जाण्याची शक्यता आहे. अ‍ॅप बॅन झाल्यानंतर फोनमध्ये अ‍ॅप प्री-इंस्टॉल असूनही त्याचा वापर करता येणार नाही. तर, शाओमी नेहमी भारतीय कायद्याचे, डेटा प्रायव्हसीच्या नियमांचे पालन करते. कोणते बदल करु शकतो यावर काम करत आहोत. आम्ही सरकारच्या निर्देशांचे पालन करु अशी, प्रतिक्रिया शाओमीकडून देण्यात आली आहे. दरम्यान, शाओमीच्या Mi Brower ला पर्याय म्हणून युजर्ससाठी गुगल क्रोम किंवा मोझिला फायरफॉक्स आणि माइक्रोसॉफ्ट एज यांच्यासारखे अनेक चांगले पर्याय आहेत.