केंद्र सरकारकडून यूएईत आयपीएल खेळवण्यासाठी तत्वतः मान्यता


नवी दिल्ली – संयुक्त अरब अमिरातीत बीसीसीआयचा आयपीएलचा आगामी हंगाम खेळवण्याचा मार्ग मोकळा होण्याचे संकेत मिळाले आहेत. केंद्र सरकारकडून आयपीएल यूएईत खेळवण्यासाठी तत्वतः मान्यता मिळाल्याची माहिती बीसीसीआयशी निगडीत सूत्रांनी दिली आहे. बीसीसीआयने याआधीच 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत यूएईत आयपीएल खेळवण्यात येईल अशी घोषणा केली होती. केवळ केंद्र सरकारकडून परवानगी मिळण्याची त्यांना प्रतीक्षा होती आणि आता तीही संपली आहे.

बीसीसीआयच्या माहितीनंतर खेळाडूंना क्वारंटाईन करण्याच्या हालचाली 8 फ्रँचायझींनी सुरू केल्या आहेत. बीसीसीआयच्या सूत्रांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, यूएईत आयपीएल खेळवण्याची परवानगी सरकारकडून मिळाली आहे, परंतु अद्याप अधिकृत कागदपत्रे हाती आलेली नाहीत. ती कागदपत्रे येत्या काही दिवसांत मिळतील, अशी आम्हाला आशा आहे.

20 ऑगस्टला यूएईत होणाऱ्या आयपीएलसाठी बहुतेक संघ रवाना होणार आहेत. तर 22 ऑगस्ट रोजी माजी विजेता चेन्नई सुपर किंग रवाना होण्याची शक्यता आहे. काही फ्रँचायझींनी त्यांच्या खेळाडूंच्या कोरोना चाचणीची तयारी केली आहे आणि प्रमुख शहरांतून ते यूएईला रवाना होणार आहेत. फ्रँचायझींनी PCR टेस्ट करून घेणे कधीही चांगले आणि निगेटिव्ह रिपोर्ट घेऊन ते यूएईत दाखल होत असतील तर अतीउत्तम, त्यानंतर त्यांना बीसीसीआयच्या SOPनुसार यूएईला रवाना होण्यापूर्वी 24 तासांत दोन कोरोना चाचणी कराव्या लागतील, असे फ्रँचायझीच्या अधिकाऱ्याने सांगितले. ते पुढे म्हणाले,”दोन कोरोना चाचणी करणे अनिवार्य असताना काही फ्रँचायझी भारत सोडण्यापूर्वी चार चाचण्या करणार आहेत.