आयसीसीची घोषणा, 2021 मध्ये भारतात होणार टी20 वर्ल्ड कप

भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी आयसीसीने मोठी घोषणा केली असून, 2021 मध्ये पार पडणारा आयसीसी टी20 वर्ल्ड कप भारतात होणार आहे. याशिवाय 2022 मध्ये ऑस्ट्रेलियात टी20 वर्ल्ड कपचे आयोजन केले जाईल, अशी माहिती आयसीसीने दिली आहे. या वर्षी ऑस्ट्रेलिया टी20 वर्ल्ड कप पार पडणार होता. मात्र कोरोना व्हायरस महामारीमुळे हा वर्ल्ड कप स्थगित करण्यात आला असून, हीच वर्ल्ड कप स्पर्धा आता 2022 मध्ये ऑस्ट्रेलियात होईल.

बीसीसीआय, क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि आयसीसीच्या बैठकीत पुढील 2 वर्षांच्या दोन टी20 वर्ल्ड कपच्या आयोजनाबाबत निर्णय घेण्यात आला. बीसीसीआय आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया क्रमशः 2021 आणि 2022 च्या वर्ल्ड कपचे यजमानपद स्विकारण्यास तयार झाले आहेत.

बीसीसीआयने 2021 मध्ये टी20 वर्ल्डकपसाठी आधीपासूनच एकप्रकारे तयारी केली होती. कारण 2022 मध्ये टी20 वर्ल्डकपचे आयोजन केल्यानंतर त्याच्या पुढील वर्षी होणाऱ्या एकदिवसीय वर्ल्ड कपच्या आयोजनासाठी कमी कालावधी मिळाला असता.