भारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंहसह 4 खेळाडूंना कोरोनाची लागण

देशातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. आतापर्यंत अनेक लोकप्रतिनिधींना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. आता खेळाडू देखील या व्हायरसच्या विळख्यात अडकत चालले आहेत. भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंहसह 4 खेळाडूंची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. बंगळुरूमधील भारतीय खेळ प्राधिकरणाच्या केंद्रात हॉकी शिबिरात रिपोर्ट केल्यानंतर या खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. हे खेळाडू शिबिरात पोहचण्याआधी आपल्या घरी होते.

शिबिरात पोहचल्यानंतर खेळाडूंना कोव्हिड-19 ची चाचणी करणे अनिवार्य होते. या खेळाडूंना घरून बंगळुरूला येताना प्रवासात कोरोनाची लागण झाल्याची शक्यता आहे. मनप्रीतसह सुरेंद्र कुमार, जसकरण सिंग आणि वरुन कुमार यांना कोरोनाची लागण झाली आहे.

या चारही खेळाडूंची रॅपिड चाचणी नेगेटिव्ह आली होती. मात्र नंतर मनप्रीत आणि सरेंद्र यांच्यात लक्षणे दिसल्यानंतर अन्य खेळाडूंसह त्यांची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली. या सर्व खेळाडूंना आता क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आलेले आहे.