बॉबी देओलच्या ‘क्लास ऑफ 83’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर रिलीज

अभिनेता बॉबी देओलच्या बहुप्रतिक्षित ‘क्लास ऑफ 83’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर अखेर रिलीज झाला आहे. ट्रेलर चाहत्यांना आवडलेला दिसत असून, रिलीज झाल्यानंतर काही मिनिटातच 1 लाखांपेक्षा अधिक युजर्सनी पाहिला आहे. या चित्रपटात बॉबी देओले खाकीमध्ये पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसेल. अ‍ॅक्शन आणि थ्रिलर भरपूर असलेल्या या ट्रेलरमध्ये मुंबई पोलिसांचे शौर्य, हिंमत दाखवण्यात आली आहे.

ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर रिलीज होणारा हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित आहे. या चित्रपटात 1983 च्या बॅचमधील मुंबईतील 5 पोलीस अधिकाऱ्यांची गोष्ट सांगितली आहे. पोलीस अधिकारी, मुंबईमधील गँगस्टर राज आणि त्यांचा खात्मा करणारे पोलीस यांच्या अवतीभोवती कथानक फिरताना दिसते.

रेड चिली एंटरटेनमेंट बॅनर अंतर्गत बनलेला हा चित्रपट येत्या 21 ऑगस्टला नेटफ्लिक्सवर रिलीज होईल. या चित्रपटाचे दिग्दर्शन अतुल सब्रवालने केले असून, बॉबी देओलसह यात अनेक नवकलाकारंना देखील संधी देण्यात आलेली आहे. हा चित्रपट हुसैन झैदी यांच्या ‘क्लास ऑफ 83’ या पुस्तकावर आधारित आहे.