क्वारंटाईनमधून बिहारच्या पोलीस अधिकाऱ्याची सुटका; म्हणाले मला नव्हे तर तपासाला केले होते क्वारंटाईन


मुंबई – बिहारमधील पाटणा शहराचे पोलीस अधिक्षक विनय तिवारी मुंबईत अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करण्यासाठी आले होते. एसपी विनय तिवारी यांना मुंबईत आल्यानंतर महानगरपालिकेने नियमांनुसार क्वारंटाईन केले होते. अखेर महानगरपालिकेने एसपी विनय तिवारी यांची क्वारंटाईनमधून सुटका केली आहे. मुंबईत पोलीस अधिक्षकांनाच क्वारंटाईन केल्यामुळे दोन्ही राज्यांमध्ये चांगलाच वाद निर्माण झाला होता. यावरून सर्वोच्च न्यायालयाने यातून चांगला मेसेज जात नसल्याचे म्हणत महाराष्ट्र सरकार तसेच मुंबई पोलिसांना झापले होते.

विनय तिवारी यांनी सुटका झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, मला नव्हे तर सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासाला क्वारंटाईन करण्यात आल्याची टीका केली. पाटणा येथे सुशांतच्या वडिलांनी पोलीस तक्रार केल्यानंतर बिहार पोलिसांचे पथक तपासासाठी मुंबईत दाखल झाले होते. विनय तिवारी यांच्या नेतृत्वाखाली तपास करण्यासाठी पथक दाखल झाले होते. पण मुंबईत दाखल झाल्यानंतर त्यांना नियमांनुसार क्वारंटाईन करण्यात आल्याने बिहार आणि महाराष्ट्र सरकारमध्ये वाद निर्माण झाला होता. मला नाही तर तपासाला क्वारंटाईन केले असे मी म्हणेन. बिहार पोलीस तपास करत होते. मला क्वारंटाईन केल्यामुळे त्यात अडथळा निर्माण झाला. ज्या वेगाने तपास करण्यासाठी आम्ही आलो होतो, तो करु शकलो नाही, अशी प्रतिक्रिया विनय तिवारी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

बिहार पोलीस अधिकाऱ्यांनी या क्वारंटाईन केल्यानंतर पालिका आयुक्तांना पत्र लिहून विनय तिवारी यांची सुटका कारण्यासाठी विनंती केली होती. तसेच याबाबत कायदेशीर मार्गाने पुढचे पाऊल उचलू, असे देखील त्यांनी म्हटले होते. दरम्यान बिहार पोलिसांनी केंद्र सरकारकडे सुशांत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची शिफारस केल्यानंतर केंद्र सरकारने ही शिफारस मान्य करत सीबीआयकडे तपास देण्यास मान्यता दिली. यानंतर सीबीआयने सुद्धा तपास हाती घेत ६ ऑगस्ट २०२० रोजी एकूण सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.