बिल व मेलिंडा गेट्स फाऊंडेशन आणि सीरम यांच्यात मोठा करार; गरिबांना देणार 10 कोटी डोस


नवी दिल्ली – सध्या संपूर्ण जगाला कोरोना या महामारीने अक्षरशः वेठीस धरले आहे. या दुष्ट संकटातून लवकरात लवकर सुटका व्हावी यासाठी जगभरातील अनेक देशांमध्ये त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, बिल गेट्स आणि भारतातील सीरम इंस्टीट्युट यांनी कोरोनावरील लस विकसित झाल्यानंतर ती गरीबांना उपलब्ध व्हावी यासाठी पुढाकार घेतला आहे. सीरम इंस्टीट्युट आणि बिल व मेलिंडा गेट्स फाऊंडेशन यांच्यात कोरोनाची लस भारतासह इतर देशांमधील गरीबांना उपलब्ध करून देण्यासाठी करार झाला आहे. कोरोनावरील दहा कोटी लस या करारानुसार गरीबांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

जगामधील आघाडीच्या औषधनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांपैकी एक भारतातील सीरम इंस्टीट्युट ही आहे. दरम्यान, कोरोनावरील लसीचे उत्पादन करण्यासाठी कोरोनावरील लस विकसित करणाऱ्या ऑक्सफर्ड विद्यापीठानेसुद्धा सीरम इंस्टीट्युटसोबत करार केला आहे. संपूर्ण जगाला ऑक्सफर्डकडून विकसित करण्यात येत असलेल्या या लसीबाबत खूप अपेक्षा आहेत. तसेच लसीचे उत्पादन झाल्यानंतर भारतीयांना ही लस माफक दरात उपलब्ध करण्याचे आश्वासन सीरम इंस्टीट्युटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पुनावाला यांनीही दिले होते.

दरम्यान, कोरोनाविरोधातील लढाईत गोरगरीबांना लस उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने जगातील दानशूर व्यक्तींमध्ये समावेश असलेल्या बिल गेट्स यांनीही आपल्या बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशनच्यावतीने मोठे पाऊल उचलले आहे. कोरोनावरील लसीसाठी बिल गेट्स यांच्या या संस्थेने सीरम इंस्टीट्युटसोबत मोठा करार केला असून, या करारामुळे गरीबांना कोरोनावरील लस उपलब्ध होणे शक्य होणार आहे.