चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत व्होडाफोन-आयडियाला 25,460 कोटींचे नुकसान

देशातील तिसरी सर्वात मोठी दूरसंचार कंपनी व्होडाफोन-आयडिला चालू आर्थिक वर्ष 2020-21 च्या एप्रिल-जून तिमाहीमध्ये तब्बल 25,460 कोटी रुपयांचा तोटा झाल्याची माहिती समोर आली आहे. थकबाकीतील अत्यधिक तरतुदीमुळे कंपनीचे नुकसान वाढले आहे. व्होडाफोन-आयडियाने शेअर बाजाराला दिलेल्या सुचनेनुसार एक वर्षांपुर्वी याच तिमाहीत कंपनीला 4,874 कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. कंपनीने 19,923.20 कोटी रुपयांच्या थकबाकीच्या तरतूद केली आहे.

कंपनीचे परिचालन उत्पन्न 2020-21 च्या पहिल्या तिमाहीत कमी होऊन  10,659.3 कोटी रुपयांवर गेले आहे, जे एका वर्षापूर्वी याच तिमाहीत 11,269.9 कोटी रुपये होते. ऑपरेशन्स रेवेन्यूमध्ये देखील 5.42 टक्क्यांनी घट झाली आहे.  कंपनीने म्हटले आहे की, जूनच्या तिमाहीत समायोजित सकल उत्पन्न (एजीआर) देय 19,440.5 कोटी रुपये निश्चित केले आहेत.

व्होडाफोन आयडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र टक्कर म्हणाले, “आर्थिक वर्ष 2020-21 चा पहिला तिमाही आव्हानात्मक होता. लॉकडाउनमुळे स्टोर दुकान बंद असल्याने रिचार्जची उपलब्धता आणि ग्राहकांची रिचार्जची कमी क्षमतेचा यावर परिणाम झाला.

दरम्यान, कंपनीवर एकूण 1,18,940 कोटी रुपयांची थकबाकी असून, यातील 92,270 कोटी रुपयांची थकबाकी स्पेक्ट्रम पेमेंटची आहे.