मुंबईत क्वारंटाईन अधिकाऱ्यांने सुशांतच्या प्रकरणाचा ‘ऑनलाईन’ तपास करावा, महापालिकेचे पत्र

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी बिहारवरून मुंबईला आलेले एसपी विनय तिवारी यांना मुंबईत क्वारंटाईन करण्यात आले होते. बिहारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी, नेत्यांनी त्यांना क्वारंटाईनमधून सोडावे असे सांगितल्यानंतर देखील मुंबई महानगरपालिकेने नकार देत पत्र लिहिले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी या संदर्भात बिहारच्या पोलीस महानिरिक्षकांना पत्र पाठवले आहे. यात म्हटले आहे की, अधिकाऱ्याकडे झूम, गुगल मीट, जियो मीट आणि मायक्रोसॉफ्ट टीम्ससारखे इंटरनेट माध्यम असून याद्वारे त्यांनी ऑनलाईन तपास करावा.

या पत्रात महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी म्हटले आहे की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्याने ऑनलाईन माध्यमातून आपल्या समकक्ष अधिकाऱ्यांशी चर्चा करावी व तपास करावा. यामुळे कोरोनाचा संसर्ग पसरणार नाही, असेही म्हटले आहे.

दरम्यान, बिहारवरून सुशांतच्या मृत्यू प्रकरणात चौकशी करण्यासाठी आलेल्या विनय तिवारी यांना क्वारंटाईन केल्याने महाराष्ट्र आणि बिहार राज्यामध्ये चांगलीच जुंपली आहे. यावरून राजकारण सुरू झाले. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी देखील याप्रकरणावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संदर्भात कारवाई केली जाईल असे म्हटले आहे.