सत्ता हिंदूच्या हातात राहिली तरच मंदिरे आणि धर्म सुरक्षित राहील; भाजप खासदाराचे ट्विट


नवी दिल्ली – काल अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाचा दिमाखदार कार्यक्रम संपन्न झाला. राम मंदिराचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमिपूजन झाले. त्यांच्यासोबत यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल, सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित होते. देशावर ओढावलेल्या कोरोनाच्या संकटामुळे या सोहळ्यासाठी अतिशय मोजक्या व्यक्तींना निमंत्रित करण्यात आले होते. याच दरम्यान भाजपच्या एका नेत्याने केलेल्या ट्विटमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

सत्ता हिंदूच्या हातात राहिली तरच मंदिरे आणि धर्म सुरक्षित राहील, असे कर्नाटकमधील बंगळूर दक्षिणचे भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांनी म्हटले आहे. त्यांनी हे ट्विट आपल्या ट्विटर अकाऊंटवरून केल्यामुळे आता त्यावरुन नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यांनी हे ट्विट राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर केले आहे. धर्म टिकवण्यासाठी हिंदूंकडे सत्ता असणे, अत्यंत गरजेचे असल्याचे म्हटले आहे.

तेजस्वी सूर्या यांनी आपल्या ट्विटमध्ये प्रिय हिंदू बांधवांनो, हिंदूंचे राज्यातील सत्तेवर नियंत्रण असणे हे धर्मासाठी आवश्यक आहे. हा सर्वात महत्वाचा धडा आहे. आपल्याकडे जेव्हा राज्याचे नियंत्रण नव्हते तेव्हा आपण आपले मंदिर गमावले. जेव्हा आपण सत्तेत परत आलो तेव्हा पुन:निर्माण केले. 2014 मध्ये 282 आणि 2019 मध्ये 303, पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे हे शक्य झाल्याचे म्हटले आहे.

यावर कर्नाटक उच्च न्यायालयामधील माजी सरकारी वकील असणाऱ्या बी. टी. व्यंकटेश यांनी आपली प्रतिक्रिया देत तेजस्वी यांच्या या वक्तव्यावर आक्षेप व्यक्त केला आहे. तेजस्वी यांचे वक्तव्य एका मोठ्या आणि सुशिक्षित शहराचे प्रतिनिधित्व करणाऱ्याला शोभणारे नसून संविधानातील भावनांच्या विरोधातील त्यांचे वक्तव्य असल्याचे व्यंकटेश यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना म्हटले आहे.